
आकांक्षा हगवणे आणि अनिशा जैन यांना वैयक्तिक सुवर्णपदक
पुणे : सॅम ग्लोबल विद्यापीठ भोपाळ या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठ बुद्धिबळ संघाने रौप्य पदक मिळवले.
वैयक्तिक प्रकारामध्ये तिसऱ्या बोर्डवर खेळताना भारती विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणे हिला सुवर्णपदक मिळाले आणि सहाव्या बोर्डवरती अनिशा जैन हिला सुवर्णपदक मिळाले.
पहिल्या फेरीमध्ये भारती विद्यापीठ संघाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघावर ४-० असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या फेरीमध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई या संघावर देखील ४-० असा सहज विजय मिळविला.तिसऱ्या फेरीमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा या संघाचा ४-० असा सहज पराभव केला. चौथ्या फेरीमध्ये वीर नर्मदा साउथ गुजरात विद्यापीठ या संघावर ३-१ अशी मात केली.
पाचव्या फेरीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या संघावर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला.मात्र सहाव्या फेरीमध्ये औरंगाबाद विद्यापीठाकडून ०.५-३.५ असा पराभव स्वीकारावा लागला.सातव्या फेरीमध्ये मुंबई विद्यापीठाबरोबरचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला आणि भारतीय विद्यापीठाला रौप्य पदक मिळाले.
संपूर्ण स्पर्धेमध्ये आकांक्षा ही अपराजित राहिली आणि तिला तिसर्या बोर्डचे सुवर्णपदक मिळाले. रौप्य पदक विजेता भारतीय विद्यापीठाचा संघ तसेच तिसऱ्या बोर्डवरची सुवर्णपदक विजेती आकांक्षा हगवणे आणि सहाव्या बोर्डाची सुवर्णपदक विजेती अनिशा जैन, भारती विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक केतन खैरे व संघाचे व्यवस्थापक हर्षद या सर्वांचे भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ विवेक साऊजी, भारती विद्यापीठाच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ के डी जाधव, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी जयकुमार, भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ सुहास मोहिते व डॉ राजेंद्र मोहिते, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ नेताजी जाधव आणि भारती विद्यापीठ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स्वप्नील विधाते यांनी अभिनंदन केले.