
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : मधुर कचरे, श्लोक गिरगेची धमाकेदार शतके
छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत ऑर्किड इंग्लिश स्कूल, एमजीएम स्कूल आणि पीएसबीए स्कूल या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये अभिषेक घाटविसावे, मधुर कचरे आणि दर्शन पालवे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात ऑर्किड इंग्लिश स्कूल संघाने एमपीएस सीबीएसई स्कूल संघावर चार विकेट राखून सहज विजय साकारला. एमपीएस स्कूलने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ८५ धावा काढल्या. ऑर्किड स्कूलने सहा बाद ८६ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. या सामन्यात अभिषेक घाटविसावे (२९), रवीराज (२२), स्वयम वाघमारे (१६) यांनी आपले योगदान दिले. गोलंदाजीत अभिषेक घाटविसावे (३-२३), स्वयम वाघमारे (३-२०), कृष्णा दळवी (२-९) यांनी आपला ठसा उमटवला.
दुसऱ्या सामन्यात एमजीएम स्कूल संघाने द वर्ल्ड स्कूल संघाचा तब्बल १७३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मधुर कचरे (११७), श्लोक गिरगे (११०) यांनी शानदार शतके झळकावली. मधुर याने ६३ चेंडूत धमाकेदार ११७ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व १९ चौकार मारले. श्लोक याने ५६ चेंडूत ११० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन षटकार व १९ चौकार ठोकले. कृतार्थ पाडळकर याने चार चौकारांसह ३० धावा फटकावल्या. गोलंदाजीत अरिंदम वीर (३-१७), वेदांत काटकर (२-११) यांनी उत्कृष्ट स्पेल टाकला.
तिसऱ्या सामन्यात चाटे स्कूलने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद ७४ धावसंख्या उभारली. पीएसबीए स्कूल संघाने नऊ षटकात दोन बाद ७८ धावा फटकावत आठ विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात रितेश कलोड (४३), आदित्य जोशी (२३), विधीत लोधी (१५) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत दर्शन पालवे (३-२३), प्रज्ञेश सोनवणे (२-७), अर्णव मांगरुळकर (१-२) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक : १) एमपीए सीबीएसई स्कूल : १६ षटकात सर्वबाद ८५ (श्रेयस भराडे १०, रवीराज २२, मयंक कदम ७, इतर ३४, स्वयम वाघमारे ३-२०, अभिषेक घाटविसावे ३-२३, कृष्णा दळवी २-९, अथर्व कोकाटे १-१२, आदर्श पाटील १-३) पराभूत विरुद्ध ऑर्किड इंग्लिश स्कूल : १५.३ षटकात सहा बाद ८६ ( अभिषेक घाटविसावे २९, स्वयम वाघमारे नाबाद १६, इतर २३, मयंक कदम २-१८, कृष्णा २-१६, साई राज १-२०, शुभ मुथा १-२२). सामनावीर : अभिषेक घाटविसावे.
२) एमजीएम स्कूल : २० षटकात एक बाद २५८ (मधुर कचरे नाबाद ११७, श्लोक गिरगे ११०, इतर ३०, कृतार्थ पाडळकर १-५७) विजयी विरुद्ध द वर्ल्ड स्कूल : २० षटकात सहा बाद ८५ (यश पारे १२, अर्णव मक्तेदार १०, कृतार्थ पाडळकर नाबाद ३०, इतर २४, अरिंदम वीर ३-१७, वेदांत काटकर २-११, रिषी सोनवणे १-१२). सामनावीर : मधुर कचरे.
३) चाटे स्कूल : २० षकात ९ बाद ७४ (आदित्य बागुल २३, यदुराज देशमुख ९, वेदांत वणवे १३, इतर १७, दर्शन पालवे ३-२३, प्रज्ञेश सोनवणे २-७, अर्णव देशमुख १-९, अर्णव मांगळुरकर १-२) पराभूत विरुद्ध पीएसबीए स्कूल : ९ षटकात दोन बाद ७८ (रितेश कलोड नाबाद ४३, दर्शन पालवे ९, विधीत लोधी नाबाद १५, आदित्य जोशी १-२७, शुभंकर काळे १-१२). सामनावीर : दर्शन पालवे.
……