
१२ जानेवारीला विशेष सर्वसाधारण सभेत निवडीवर होणार शिक्कामोर्तब
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव म्हणून देवजीत सैकिया हे सूत्रे स्वीकारणार आहेत. १२ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत देवजीत सैकिया आणि प्रभातेज सिंग भाटिया यांची अनुक्रमे बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली जाईल. प्रत्यक्षात निवडणूक लढविणाऱ्यांच्या अंतिम यादीत हे दोनच उमेदवार आहेत.
बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी आणि भारताचे माजी सीईसी (मुख्य निवडणूक आयुक्त) अचल कुमार जोती यांनी मंगळवारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी तयार केली. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख गेल्या आठवड्यात संपली तर मंगळवारी दुपारी दोन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली.
१२ जानेवारीला निकाल जाहीर होईल
एकाही उमेदवाराने आपले नाव मागे न घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. १२ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेदरम्यान निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल, जी आता औपचारिकता आहे.
जय शाह यांनी १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून देवजीत सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम करत आहेत. कोषाध्यक्षपदासाठी भाटिया यांनी अर्ज दाखल केला. नुकतेच महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आशिष शेलार यांनी हे पद रिक्त केले होते.