
त्रिनिदाद : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉईड यांनी मोठ्या तीन देशांदरम्यान अधिक मालिका आयोजित करण्यासाठी द्विस्तरीय कसोटी प्रणाली असणे ही क्रिकेटच्यादृष्टीने वाईट कल्पना असल्याचे स्पष्ट केले. वेस्ट इंडिज आणि ज्या देशांनी कसोटी खेळण्याचा दर्जा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत त्यांच्यासाठी हे खूप नुकसानकारक असेल, असे लॉईड यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने तीन देशांदरम्यान आणखी मालिका आयोजित करण्यासाठी द्विस्तरीय कसोटी प्रणालीची शक्यता तपासत आहे. ‘द एज’च्या बातमीनुसार आयसीसीचे अध्यक्ष जय शाह या महिन्याच्या शेवटी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड आणि त्यांचे इंग्लंडचे समकक्ष रिचर्ड थॉम्पसन यांची भेट घेणार आहेत.
हा निर्णय चुकीचा ठरेल
त्रिनिदाद आणि टोबॅगो गार्डियनने लॉयड यांना उद्धृत केले की, ‘मला वाटते की कसोटी खेळण्याचा दर्जा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेणाऱ्या सर्व देशांसाठी हे भयंकर असेल आणि आता ते खालच्या विभागात एकमेकांशी खेळतील.’ आयसीसीचे माजी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी वेस्ट इंडिजचे विघटन करून वेगळे देश म्हणून खेळावे या सूचनेवर निराशा व्यक्त करून लॉईड म्हणाले, ‘आमचा (वेस्ट इंडिज) इतिहास मोठा आहे आणि आता तुम्ही आम्हाला सांगणार आहात (आम्ही विखुरले जावे) आर्थिक परिस्थितीमुळे.’
निधीचे असमान वितरण
इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या लॉईड यांनी अव्वल तीन राष्ट्रे आणि उर्वरित देशांमधील कामगिरीतील असमानतेसाठी आयसीसीद्वारे निधीच्या असमान वितरणाचे श्रेय दिले. ८० वर्षीय माजी कर्णधार लॉईड म्हणाले की, ‘तुम्ही कल्पना करू शकता की ते वेस्ट इंडिजला संपवण्याबद्दल बोलत आहेत, हा योग्य मार्ग नाही. योग्य मार्ग म्हणजे त्यांना (वेस्ट इंडिज आणि इतर संघांना) समान रक्कम देणे जेणेकरून ते त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करू शकतील, अधिक चांगली व्यवस्था उभारू शकतील आणि जेणेकरून ते त्यांचे क्रिकेट सुधारू शकतील.’
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर टीका
लॉईड यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलवरही टीका केली आणि ते ‘सुव्यवस्थित’ नसल्याचे सांगितले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकल दोन वर्षे चालते. परंतु सर्व १२ कसोटी खेळणारे देश त्यात सहभागी होत नाहीत. झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंडला त्यात स्थान मिळालेले नाही तर उर्वरित नऊ संघही एकमेकांशी सायकलमध्ये खेळत नाहीत. हे पद्धतशीर नाही. कारण मी कसोटी संघात असल्यास, मला क्रिकेट खेळायचे आहे जेणेकरून मी त्या प्रणालीसाठी पात्र ठरू शकेन,’ असे लॉईड म्हणाले.
लॉईड म्हणाले की, ‘त्यांनी (आयसीसी आणि क्रिकेट बोर्ड) खाली बसून एक अशी व्यवस्था बनवली पाहिजे ज्यामध्ये फक्त टी २० क्रिकेटच नाही. लोकांना अजूनही कसोटी क्रिकेट बघायचे आहे आणि जोपर्यंत ते योग्य होत नाही तोपर्यंत आपण सर्वजण या व्यवस्थेत राहू.’