
मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई यांच्या वतीने ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतर सहकारी बँक कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ व २६ जानेवारी रोजी दादर-पश्चिम येथील युनियनच्या कार्यालय परिसरात होणार आहे.
कॅरम स्पर्धा महिला एकेरी व दुहेरी आणि पुरुष एकेरी व दुहेरी गटात होईल. बुद्धिबळ स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये होणार आहे. दोन्ही स्पर्धा बाद पद्धतीने होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्या व उपविजेत्यांना रोख पुरस्कार व आकर्षक चषक देण्यात येतील.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहकारी बँकांमधील कॅरम व बुद्धिबळ खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी १० जानेवारीपूर्वी युनियनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
पारितोषिक वितरण
विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंचा गौरव अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, तसेच हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, जनार्दन मोरे, धर्मराज मुंढे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत. ही स्पर्धा सहकारी बँक कर्मचारी व खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार आहे.