
अमरहिंद मंडळाची शालेय कबड्डी स्पर्धा
मुंबई : अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेचा थरार दादरच्या अमरहिंद मंडळाच्या पटांगणावर सुरू झाला. या स्पर्धेत मुलांच्या गटात एसआयइएस. आणि आर्यन एज्युकेशन या संघांनी विजयी सलामी दिली, तर मुलींच्या विभागात सोशल सर्व्हिस लीग आणि आंध्र एज्युकेशन यांनी प्रभावी कामगिरी करत पुढील फेरी गाठली.
मुलांच्या गटात माटुंग्याच्या एसआयइएस संघाने दादरच्या साने गुरुजी मराठी विद्यालयावर ५१-४८ (७-४) असा रोमांचक विजय मिळवला. सामन्यात दोन्ही संघांची पूर्ण डावानंतर ४४-४४ अशी बरोबरी झाली होती. मात्र, अधिक चढायांमुळे एसआयइएस संघ विजयी ठरल गिरगावच्या आर्यन एज्युकेशन संघाने परेलच्या सोशल सर्व्हिस लीग संघाला ४५-४४ अशा निसटत्या फरकाने पराभूत केले.
दादरच्या पीपल एज्युकेशन संघाने डॉ. एस. कुलकर्णी विद्यालयाचा ६३-५३ असा सहज पराभव केला. गिरगावच्या मारवाडी विद्यालयाने दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिराचा ५६-३८ असा पराभव केला.
मुलींच्या गटात परेलच्या सोशल सर्व्हिस लीग संघाने अतिशय चुरशीच्या लढतीत बांद्राच्या महात्मा गांधी विद्यालयावर ४७-४६ अशी मात केली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. माटुंग्याच्या आंध्र एज्युकेशन संघाने केएमएस इंग्लिश हायस्कूलचा ५९-१७ असा मोठ्या फरकाने पराभव केला. विक्रोळीच्या डॉ. आंबेडकर विद्यालय संघाने वडाळ्याच्या एनकेई हायस्कूलचा ३६-०५ असा सहज पराभव करत पुढे मजल मारली.