
सोलापूर : पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या आशियाई तायक्कॉन गेम्स स्पर्धेसाठी सोलापूर येथील आरोही स्पोर्ट्स क्लबच्या सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी (पुणे) येथे पहिली आशियाई तायक्कॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी ८ देशांतील खेळाडू येणार आहेत. ही स्पर्धा २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे. २९ जानेवारी रोजी रिपोर्टिंग होईल आणि ३० व ३१ जानेवारी रोजी स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवड चाचणी पंढरपूर येथे कवठेकर प्रशाला येथे घेण्यात आली. या निवड चाचणी स्पर्धेतून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात सात खेळाडू हे आरोही स्पोर्ट्स क्लबचे आहेत, अशी माहिती प्रशिक्षक श्रीकांत पुजारी यांनी दिली.
आशियाई तायक्कॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सोहम शशिकांत भांगे, अजय विठ्ठल निकम, अजय सुनील डोंगरे, समर्थ तानाजी घुगे, रुद्र राजेंद्र पवार, मयूर दीपक गलांडे या आरोही स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचा समावेश आहे.
या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, संघटनेचे राज वागदकर, मिलिंद काटमोरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना श्रीकांत पुजारी, रामचंद्र करणवर, ओंकार वागज, सिद्धेश्वर रणदिवे, बिरुदेव पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.