
पीवायसीच्या निखिल लूनावत, अमेय भावे, स्वप्निल फुलपगार, आदित्य लोंढे यांची अर्धशतकी खेळी
पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पाचव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गट साखळी फेरीत क गटात निखिल लूनावत (८१ धावा), अमेय भावे (७१ वा), स्वप्निल फुलपगार (७४ धावा), आदित्य लोंढे (५५ धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह आदित्य डावरे (४-१८) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पारसी जिमखाना संघाचा ८४ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकात ६ बाद ३१२ धावा केल्या. यात निखिल लुनावतने ६८ चेंडूत ४ चौकार व ५ षटकाराच्या मदतीने ८१ धावा, अमेय भावेने ९८ चेंडूत ९ चौकारांसह ७१ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने १५३ चेंडूत १५० धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघे एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकास फलंदाजीस उतरलेल्या स्वप्निल फुलपगारने ५८ चेंडूत ६ चौकार व ४ षटकाराच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. त्याला आदित्य लोंढेने ३२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारासह ५५ धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ५० धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. पारसी जिमखाना कडून निनाद रॉड्रिक्सने ६६ धावांत ३ गडी, तर गौरव खैरै (१-३२), यश भंडारी (१-४८), कृशिल लोंढे (१-६३) यांनी एक गडी बाद केला.
३१२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पारसी जिमखाना संघाचा डाव ३९.१ षटकात सर्व बाद २२८ धावांवर संपुष्टात आला. यात निनाद चौगुले ६१, यशवंत काळे ४८, यश बांबोळी ३६, सिद्धार्थ करपे २० यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवायसीकडून आदित्य डावरेने १८ धावात ४ गडी, स्वराज चव्हाणने ६० धावात ३ गडी, अब्दुस सलामने २८ धावात १ गडी, सईद इझानने ३९ धावात १ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर आदित्य डावरे ठरला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन दोशी इंजिनिअर्सचे संचालक अमित दोशी आणि आशुतोष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे, विनायक द्रविड, कुणाल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.