
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय
लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले जात असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मौन सोडत कराची व लाहोर स्टेडियमवर त्रिकोणी मालिका खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय तिरंगी मालिका मुलतानऐवजी कराची आणि लाहोरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही त्रिकोणी मालिका १९ फेब्रुवारीपासून कराची येथे सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी स्पर्धा आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्णपणे तयार नाहीत, परंतु पीसीबीने या स्टेडियममधील पुनर्बांधणीच्या कामात विलंब झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीची जोरदार तयारी
पीसीबीने म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम आणि कराचीच्या नॅशनल बँक स्टेडियममधील पुनर्बांधणीचे काम अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण केले जाईल. ‘गद्दाफी स्टेडियम आणि नॅशनल बँक स्टेडियममधील तयारीच्या प्रगतीच्या टप्प्या लक्षात घेता पीसीबीने आगामी त्रिकोणी एकदिवसीय मालिका या दोन ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे पीसीबीने म्हटले आहे.
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेली ही मालिका मूळतः मुलतानमध्ये होणार होती. या निर्णयातून पीसीबीचा या प्रगत स्टेडियमच्या तयारी वरील विश्वास आणि खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रतिबिंब पडते.
गद्दाफी स्टेडियममध्ये नवीन खुर्च्या बसविल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची क्षमता ३५ हजारपर्यंत वाढणार आहे. याशिवाय ४८० एलईडी दिवे बसवले जात आहेत. स्टेडियममधील पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्टेडियमचे उद्घाटन केले जाईल असे सांगितले जात आहे. कराचीमध्ये ३५० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत आणि दोन मोठे डिजिटल डिस्प्ले आणि ५ हजार नवीन खुर्च्या देखील बसवल्या जात आहेत. पीसीबीने सांगितले की रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये १० हजार नवीन खुर्च्या, सुधारित हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि दोन डिजिटल रिप्ले स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेल अंतर्गत केले जाणार आहे. १९ फेब्रुवारीपासून हायब्रिड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाईल. या स्पर्धेसाठी, सर्व आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १२ लीग स्टेज सामने होतील आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर विजेतेपदाचा सामना दुबईमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. यानंतर, २ मार्च रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी खेळायचे आहे. त्याचा अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळला जाईल.