
गायत्री सुरवसे, तृप्ती लोंढेची प्रभावी गोलंदाजी
पुणे : सुरत येथे सुरू असलेल्या बीसीसीआय अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धेत विदर्भ महिला संघाने महाराष्ट्र महिला संघावर ५२ धावांनी विजय नोंदवला.
विदर्भ महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७.५ षटकात सर्वबाद ११२ धावा काढल्या. त्यात तन्वी मेंढे हिने सर्वाधिक ३४ धावा फटकावल्या. श्रेया लांजेवार (१०), मानसी बोरीकर (१०) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला. महाराष्ट्र संघाकडून गायत्री सुरवसे हिने प्रभावी गोलंदाजी करत २४ धावांत चार विकेट घेतल्या. जान्हवी वीरकर हिने ३३ धावांत तीन बळी घेतले. निकिता सिंग, श्रुती महाबळेश्वरकर, सहानी कहांडळ यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
महाराष्ट्र संघाला विजयासाठी ११३ धावांची गरज होती. मात्र, महाराष्ट्र महिला संघ २६.२ षटकात अवघ्या ६० धावांवर सर्वबाद झाला. श्रद्धा गिरमे (१०), साक्षी शिंदे (१०) या दोघींनाच धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश मिळाले. अन्य फलंदाज लवकर बाद झाल्याने महाराष्ट्र संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
विदर्भ संघाकडून तृप्ती लोंढे हिने १० धावांत चार विकेट घेतल्या. यशश्री सोले हिने २८ धावांत तीन बळी मिळवले. धारावी टेंभुर्णे व श्रेया लांजेवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.