महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघास दुहेरी मुकुट

  • By admin
  • January 9, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप : छत्तीसगढ, दिल्ली संघाला उपविजेतेपद 

जळगाव : जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ६८व्या आंतर शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. दोन्ही गटात विजेतेपद पटकावत महाराष्ट्र संघाने दुहेरी मुकुट संपादन केला. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांनी भेट देऊन खेळाडूंची ओळख करुन घेत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही संघांनी सातत्याने चांगली कामगिरी करत निविर्वाद वर्चस्व राखले. मुले व मुलींच्या दोन्ही गटात महाराष्ट्र राज्याने अजिंक्यपद प्राप्त केले आहे. विजयी संघांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विजयी चषक प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. 

‘क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचा व देशाचा नावलौकिक वाढवावा. राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट असून या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या लोकांची संस्कृती व भाषेचा परिचय होतो व त्यातून आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. येथील सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतून आपण निश्चितच खूप चांगल्या आठवणी घेवून जाणार आहात. ज्या संघांना विजय मिळाला नाही अशा संघांनी येत्या काळात अधिक सराव करुन पुढील स्पर्धांमध्ये विजय मिळविण्याच्या प्रयत्न करावा व खेळाच्या क्षेत्रामध्ये
कठोर परिश्रम करुन यशस्वी व्हावे,’ असे  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी महापौर सीमाताई भोळे, सिद्धी विनायक संस्थेच्या संचालिका डॉ. अमृताताई सोनवणे, अजबसिंग पाटील, पद्मसिंह कौंतेय, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष व राज्याचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.  

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे खेळाडू व स्वयंसेवक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेचा अंतिम निकाल 

१७ वयोगट मुले : १. महाराष्ट्र, २. छत्तीसगढ, ३. पंजाब.
१७ वयोगट मुली : १. महाराष्ट्र, २. दिल्ली, ३. तेलंगणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *