गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

  • By admin
  • January 9, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

पुणे : गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक, संस्थेच्या अष्ठहजारी शिखर मोहिमांचे नेते, गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांना २०२३ चा प्रतिष्ठित ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. 

हा पुरस्कार अर्जुन पुरस्कारास समकक्ष असून भारतातील साहस क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीसाठी दिला जातो. हा पुरस्कार १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

हा उल्लेखनीय पुरस्कार उमेश झिरपे यांच्या गिर्यारोहण कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि गिरिप्रेमीसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. उमेश झिरपे यांनी आपल्या जीवनाचे समर्पण भारतातील पर्वतारोहणाच्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी केले आहे, आणि त्यांच्या नेतृत्व, कौशल्य आणि साहसासाठी असलेल्या अढळ भावनांमुळे अनेक नव्या गिर्यारोहकांना प्रेरणा मिळाली आहे.

तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हे भारतातील साहस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि उमेश झिरपे यांच्या पर्वतारोहण समुदायातील जीवनभराच्या योगदानामुळे आणि साहसाच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि उत्साहामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 

उमेश झिरपे हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष असून, यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिव छत्रपती साहसी क्रिडा पुरस्कार व जगभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गिर्यारोहण क्षेत्रातील उमेश झिरपे यांची कामगिरी

– १९८७ : बेसिक माऊंटेनियरींग कोर्स पूर्ण

– १९८८ : अँडव्हान्स माऊंटेनियरींग कोर्स पूर्ण

– माऊंट प्रियदर्शनी (५२५० मी.), माऊंट थेलू (६२०२ मी.), माऊंट भ्रीगु (६२८९ मी.), माऊंट मंदा-१ (६५६८ मी.), माऊंट सुदर्शन (६५०७ मी.), माऊंट भागीरथी-२ (६५१२ मी.), माऊंट श्रिकंठ (६१३३ मी.), माऊंट जॉनली (६६३२ मी.), माऊंट नून (७१३५ मी.) या भारतातील हिम शिखरांवर यशस्वी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व

– माऊंट मेरा (६४७६ मी.) या नेपाळमधील हिमशिखरावर यशस्वी चढाई

– जगातील सर्वोच्च आठ अष्ठहजारी हिमशिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व करणारे भारतातील एकमेव व्यक्ती

– २०२३ मध्ये जगातील पहिल्या यशस्वी मेरू मोहिमेचे यशस्वी नेतृत्व.

– लिंगाणा, सिंहगड खंदकडा, तानाजी कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका, विसापूर कातळभिंत, वानरलिंगी, ड्युक्स नोज, तैलबैला कातळभिंती, ढाकोबा, कात्राकडा अशा सह्याद्रीतील अनेक प्रस्तरारोहण मोहिमा यशस्वी.

– कोकण पूर, लेह ढगफुटी, उत्तराखंड भूकंप, नेपाळ भूकंप, हिमालयातील मोहिमांमध्ये बचाव कार्य, कोरोना टास्क फोर्स निर्मिती यासारख्या अनेक संकट काळातील बचाव कार्यात सहभाग.

– ५०० हून अधिक गिर्यारोहणावरील कार्यशाळा.

– १००० हून अधिक शाळा, कॉलेज, कंपनी, संस्थांमध्ये व्याख्याने.

– १००० हून अधिक गिर्यारोहण विषयावरील लेख प्रसिद्ध.

– एव्हरेस्ट, शेर्पा, कांचनजुंगा, मुलांसाठी गिर्यारोहण पुस्तकांचे लेखन.

– गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगचे संस्थापक संचालक.

– गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे संचालक.

– अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या महाराष्ट्रातील गिर्यारोहण या साहसी खेळाच्या सर्वोच्च शिखर संस्थेचे अध्यक्ष.

– स्वरूपसेवा या समाजातील वंचित घटकांकरिता कार्यान्वित असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *