
नाशिक, नागपूर संघाला उपविजेतेपद, मुंबई संघ तिसऱ्या स्थानावर
यवतमाळ : राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत कोल्हापूर, पुणे या संघांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले. नाशिक, नागपूर संघाने उपविजेतेपद संपादन केले. मुंबई विभाग तिसऱ्या स्थानी राहिला.
यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक मैदानावर संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत १९ वर्षे मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी संघाने तर मुलींच्या गटात विद्या विकास मंदिर निमगाव महाळुंगे पुणे संघाने दमदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले. नाशिक व नागपूर विभागाला अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने आणि महाराष्ट्र डॉजबॉल व यवतमाळ जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, अमरावती या आठ विभागातील १८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
१९ वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर विरुद्ध नाशिक असा अंतिम सामना रंगला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रत्नागिरी संघाने इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर जळगाव या संघाचा ८-६ अशा २ गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. पुणे विभागाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
नांदेड येथील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते अंतिम सामन्याची सुरुवात करण्यात आली. विद्या विकास मंदिर निमगाव महाळुंगे पुणे विरुद्ध नागपूर विभागातील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी या संघादरम्यान झालेल्या सामन्यात पुणे संघाने ६-३ अशा फरकाने विजय साजरा करीत प्रथम स्थान पटकावले. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल कांदिवली, मुंबई संघ तिसऱ्या स्थानी राहिला.
यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाधवानी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत चतुर, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते डॉ उल्हास नंदुरकर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ हनुमंतराव लुंगे, जिल्हा शारीरिक शिक्षक व एकविध क्रीडा संघटनेचे सचिव किरण फुलझेले, शारीरिक शिक्षक पियुष भूरचंडी उपस्थित होते. मुला-मुलींच्या दोन्ही गटात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संघाला आकर्षक, ट्रॉफी, प्रमाणपत्र,’चीतपट’ पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते चायनीज ताईपाई येथे एशियन वूमेन्स सॉफ्टबॉल एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यवतमाळच्या मृणाल फुसाटे या खेळाडूचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्रा निलेश भगत यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांनी मानले. स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी चैताली राऊत, कल्याणीताई, अभय धोबे, मनीष डोळसकर,अण्णा पाळेकर, खुशाल भगत, गिरीराज गुप्ता, अमोल जयसिंगपुरे, एम एन मीर, श्रीरंग रानडे, भार्गव रानडे, तन्मय डोळे, संजय सतारकर, संजय बट्टावार, अभिजीत पवार, आशिष जगताप, नौशाद शेख, धीरज तायडे, स्वप्नील डंभारे, अमित आगरे, अनिल पवार, योगेश टाकमोघे, केतन जगताप, सोमनाथ दगडघाटे यांनी परिश्रम घेतले.