
मुंबई : मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनतर्फे सह्याद्री विद्या प्रसारक संस्था भांडूप येथे आयोजित १४ आणि १६ वर्षांखालील मुला-मुलींच्या ५६व्या आंतर शालेय खो-खो स्पर्धेत ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूल, भांडुपच्या पराग इंग्लिश स्कूल आणि गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूल यांनी विजेतेपद मिळवले.
१४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात भांडुपच्या पराग इंग्लिश स्कूलने गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूलचा १ डाव आणि ६ गुणांनी सहज पराभव केला. पराग संघाचा साई गावकर विजयाचा शिल्पकार ठरला, ज्याने ३ मिनिटे ५० सेकंद पळतीचा उत्कृष्ट खेळ केला. त्याला भव्य इंगळे आणि स्पर्श धुरी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करून साथ दिली. पराभूत संघाच्या देवांश सावंतने १ मिनिट २० सेकंद संरक्षण करत १ गडी टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची झुंज एकाकी ठरली.
१४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात गोरेगावच्या गोकुळधाम हायस्कूलने बांद्र्याच्या आई ई एस न्यू इंग्लिश स्कूलचा ३ गुण आणि १ डावाने पराभव करून मागील वर्षीच्या पराभवाची परतफेड केली. संघातील ज्ञानदा सावंत (४ मिनिटे ३० सेकंद), चैताली राव (१ मिनिट २० सेकंद, २ गडी बाद), आणि अर्या अरख (३ गडी बाद) यांचा विजयात मोठा वाटा होता.
१६ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूलने पहिल्यांदाच राणी लक्ष्मी ट्रॉफी जिंकली. संघाच्या पृथा पाटीलने १ मिनिट संरक्षण करत ५ गडी बाद केले, तर फ्रान्सिना बिजीलने १ मिनिट १० सेकंद पळत संरक्षण करत २ गडी टिपले. एकताने ३ मिनिटे पळतीचा सुरेख खेळ केला. नालंदाच्या याधिका कुलकर्णी आणि कृषा शाह यांनी संघाला चांगली लढत दिली.
पारितोषिक वितरण:
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सह्याद्री विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जगनाथ आंब्रे, सहसचिव रमेश राणे, आणि रामसागर पांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धा प्रमुख प्रशांत पाटणकर आणि एमएसएसए भारतीय खेळ सचिव दीपक शिंदे यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.