
आंबेडकर विद्यालय क्रिकेट संघाला विजेतेपद
मुंबई : ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धा खेळणे ही तुमच्यासाठी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले.
ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांनी या स्पर्धेमुळे खेळाडूंना दर्जेदार खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी मिळते, शिवाय माजी क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपले कौशल्य दाखवता येते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी वेंगसरकर यांनी युवा क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. या स्पर्धेत जीपीसीसी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाने प्रभावी कामगिरी करत अमेय क्रिकेट अकादमी संघावर ८० धावांनी मात केली आणि विजेतेपद पटकावले.
४० षटकांच्या या स्पर्धेत जीपीसीसी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाने प्रथम फलंदाजी करत ३८.३ षटकांत १७३ धावा केल्या. त्यांच्या डावात अंकित म्हात्रे (३९), आदित्य कांटे (३३), अमेय वाडेकर (२५), अंश नाथवानी (१९) आणि अद्वैत तिवारी (१६) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अमेय क्रिकेट अकादमीच्या गोलंदाजांत हार्दिक गजमलने २९ धावांत ३ बळी मिळवले, तर ओम प्रजापती (२/२६) आणि अर्णव गवाणकर (२/१८) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
या आव्हानाचा पाठलाग करताना अमेय क्रिकेट अकादमी संघाचा डाव केवळ २४.२ षटकांत ९३ धावांत संपुष्टात आला. मोहम्मद सलमान खान याने १६ धावांत ४ बळी घेत निर्णायक कामगिरी केली. अद्वैत तिवारीने (३/२०) आणि आयुष्य चव्हाणने (२/२४) त्याला चांगली साथ दिली.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मोहम्मद सलमान खान याला मिळाला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अमेय क्रिकेट अकादमीच्या आशिष खेडेकर याला ११ बळींसाठी गौरविण्यात आले, तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओंकार नाईक याची निवड झाली.
पारितोषिक वितरण
विजेत्या संघाला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक, मुंबई उच्च न्यायालयाचे पी. पी. दीपक ठाकरे, आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : जीपीसीसी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय : ३८.३ षटकांत सर्वबाद १७३ (अंकित म्हात्रे ३९, आदित्य कांटे ३३, अमेय वाडेकर २५; हार्दिक गजमल ३/२९, ओम प्रजापती २/२६, अर्णव गवाणकर २/१८) विजयी विरुद्ध अमेय क्रिकेट अकादमी: २४.२ षटकांत सर्वबाद ९३ (हार्दिक गजमल २७, आरव गौतम १५; मोहम्मद सलमान खान ४/१६, अद्वैत तिवारी ३/२०, आयुष्य चव्हाण २/२४).