
मेलबर्न : रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागलचा सामना चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचॅकशी होणार आहे.
२७ वर्षीय सुमित नागल सध्या एटीपी क्रमवारीत ९६ व्या स्थानावर आहे. सुमित टॉप १०४ खेळाडूंमध्ये स्थान मिळवत हंगामातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ साठी पात्र ठरला आहे.
हरियाणाच्या सुमित नागरने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या २७ व्या क्रमांकावर असलेल्या अलेक्झांडर बुब्लिकला हरवले होते. परंतु, पुढच्या फेरीत त्याला चीनच्या जुनचेंग शांगकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑकलंड एएसबी क्लासिकमध्ये तो पहिल्या फेरीत अमेरिकन अॅलेक्स मिशेलसेनकडून पराभूत झाला. सुमित नागल अलीकडेच डेव्हिस कप खेळण्यास नकार दिल्यामुळे चर्चेत आला होता.
गतविजेता यानिक सिनर आणि १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविच यांना वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅममध्ये विरुद्ध ड्रॉ मिळाले आहेत, म्हणजेच गेल्या वर्षीप्रमाणे ते उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येणार नाहीत. गेल्या वर्षी उपांत्य फेरीत सिनेरने जोकोविचला हरवले आणि डॅनिल मेदवेदेवला ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असे हरवून त्याचे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले.
अव्वल क्रमांकावर असलेल्या सिनेरचा पहिल्या फेरीत निकोलस जरीशी सामना होणार आहे. त्यांच्या ड्रॉमध्ये टेलर फ्रिट्झ, बेन शेल्टन आणि मेदवेदेव यांचाही समावेश आहे. पहिल्या फेरीत फ्रिट्झचा सामना अमेरिकेच्या जेन्सन ब्रूक्सबीशी होईल. जोकोविच आणि तिसऱ्या क्रमांकाचा कार्लोस अल्काराझ हे क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांसमोर येऊ शकतात.
महिला गटात आर्यना सबालेन्का २०१७ ची यूएस ओपन चॅम्पियन स्लोएन स्टीफन्स आणि १७ वर्षीय मीरा अँड्रीवा यांच्यासोबत ड्रॉवर आली आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना तिसऱ्या मानांकित कोको गॉफशी होऊ शकतो. पहिल्या फेरीत गॉफ माजी विजेत्या सोफिया केनिनशी खेळेल आणि सातव्या मानांकित जेसिका पेगुला देखील ड्रॉमध्ये आहे. ऑस्ट्रेलियन ओपन रविवारी मेलबर्नमध्ये सुरू होत आहे आणि १५ दिवस चालेल.