एमसीए महा टी २० क्रिकेट स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महा टी २० क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने धाराशिव संघाचा सात विकेट राखून पराभव केला.
रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. धाराशिव संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १५१ धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगर संघाने १२.१ षटकात तीन बाद १५४ धावा फटकावत सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला.
या सामन्यात सलमान अहमद याने ५८ धावांची तुफानी खेळी केली. सलमानने पाच उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. योगेश चौधरी याने २८ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी साकारताना चार चौकार व चार टोलेजंग षटकार ठोकले. ध्रुव ठक्कर याने दोन चौकारांसह ३३ धावा फटकावल्या. गोलंदाजीत हर्षवर्धन पवार (२-१३) व पार्थ लोंढे (२-२६) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : धाराशिव : २० षटकात पाच बाद १५१ (शुभम १३, ध्रुव ठक्कर ३३, ओम कामठे ३०, सन्यम जैन १६, साबीर शेख २१, निखिल पाटील नाबाद १५, विकास पवार नाबाद १३, हर्षवर्धन पवार २-१३, अनिकेत काळे १-३२, आर्यन शेजुळ १-२९) पराभूत विरुद्ध छत्रपती संभाजीनगर : १२.१ षटकात तीन बाद १५४ (सागर पवार २६, सलमान अहमद ५८, योगेश चौधरी नाबाद ५२, पार्थ लोंढे २-२६, विकास पवार १-३९).