
पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मलकापूर : आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त येथील क्रीडा संघटना स्पोर्ट्स झोन मलकापूर यांच्यावतीने समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तालुका क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव शिंदे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार चैनसुख संचेती, तहसीलदार राहुल तायडे, भरतशेठ दंड, राजेश महाजन, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, रेल्वे पोलिस उपनिरीक्षक जसबीर राणा, कोमल तायडे, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळ व खेळाडूंना सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून पत्रकार आद्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आयोजित सत्कार समारंभामध्ये उद्योजक व रोजगार क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एस के इंटरप्रायजेस् कंपनीच्या संचालिका कोमलताई तायडे यांना युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मलकापूर विधानसभा मतदार संघातून सहाव्यांदा निवडून आलेले आमदार चैनसुख संचेती यांना लोक नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर शहरातील विविध वृत्तपत्रामध्ये निर्भीड व निःपक्ष वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांना देखील यावेळी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून सराव करणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नावलौकिक कमाविणाऱ्या खेळाडूंना देखील गौरविण्यात आले. यावेळी बोलताना विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनी तालुका क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर खेळाडूंना निवास व्यवस्थेसाठी हॉस्टेल व अद्ययावत मैदान उपलब्ध करून देण्याकरिता राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नितीन भुजबळ यांनी केले. चंद्रकांत साळुंके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष डॉ नितीन भुजबळ, सचिव विजय पळसकर, राजेश्वर खंगार, संजय जाधव, अतुल जगदाळे, बाळु जोगदंड, गुरूदत्त यादव यांच्यासह अनेकांचे योगदान राहिले.