
- महाराष्ट्राचे प्रतीक वाईकर, प्रियंका इंगळे करणार नेतृत्व
- महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींची मदत जाहीर
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा प्रतीक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे हे खेळाडू करणार आहेत.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारतीय खो-खो संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा लक्षणीय सहभाग आहे. पुरुष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळे हिची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील पाच पुरुष आणि तीन महिला खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीत राज्याने आपल्या खो-खो खेळातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भारतीय खो-खो संघात प्रतीक वाईकर (कर्णधार), सुरेश गरगटे, आदित्य गणपुले (सर्व पुणे), रामजी कश्यप (सोलापूर), अनिकेत पोटे (मुंबई उपनगर), प्रियंका इंगळे (कर्णधार, पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव), रेश्मा राठोड (ठाणे) या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
संघ निवड समितीचे योगदान
भारतीय संघाची निवड महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव आणि खजिनदार गोविंद शर्मा, एम सीतारामी रेड्डी, उपकार सिंग विर्क, सुषमा गोळवलकर, एस एस मलिक, डॉ मुन्नी जून (एमडीयू), नितुल दास, वंदना शिंदे, आनंद पोकार्डे यांच्या समितीने केली. या समितीमध्ये भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि सरचिटणीस एम एस त्यागी पदसिद्ध अधिकारी होते.
महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा
महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या निवडीमुळे राज्यभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघ
पुरुष संघ : प्रतीक वाईकर (कर्णधार), सचिन भार्गो, सिवा पोथीर रेड्डी, निखिल बी, सुमन बर्मन, पाबनी साबर, सुरेश गरगटे, आदित्य गणपुले, आकाश कुमार, अनिकेत पोटे, मेहूल, रामजी कश्यप, गोवथम एम के, शुभ्रमणी व्ही, एस रॉकसन सिंग.
राखीव खेळाडू : अक्षय भांगरे, राजवर्धन पाटील, विश्वनाथ जानकीराम.
भारतीय महिला संघ : प्रियंका इंगळे (कर्णधार), भिलार देवजीभाई, चैत्रा बी, अंशु कुमारी, मिनु, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, निर्माला भाटी, निता देवी, सुभश्री सिंग, मेघी माझी, वैष्णवी बजरंग, मोनीका, नसरीन शेख, नाझी बीबी.
राखीव: संपदा मोरे, रितीका सिलोरीया, प्रियांका भोपी.
महाराष्ट्र सरकारची १० कोटींची मदत
पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने १० कोटींची मदत जाहीर केली. यासाठी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ चंद्रजीत जाधव यांच्यासह अध्यक्ष सुधांशू मित्तल व एम एस त्यागी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन स्पर्धेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती. ही मदत महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून देण्यात आली आहे. या मदतीमुळे तमाम खो-खो प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.