
प्रतिका रावल, तेजल हसबनीसचे धमाकेदार अर्धशतक
राजकोट : प्रतिका रावल आणि तेजल हसबनीस यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड महिला संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.
भारताने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा ६ विकेट्सने पराभव करुन मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल भारताने ३४.३ षटकांत सामना जिंकला. त्यासाठी प्रतिका रावल आणि तेजल हसबनीस यांनी दमदार कामगिरी केली. दोघींनीही अर्धशतके ठोकली. भारतीय संघाने हा सामना स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. संघाने २७ धावांवर पहिली विकेट गमावली. सारा फोर्ब्स फक्त ९ धावा करून बाद झाली. त्यानंतर उना रेमंड ५ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. ओर्ला ९ धावा करून बाद झाली. पण कर्णधार गॅबी लुईसने एका टोकाला धरून शानदार फलंदाजी केली. तिने १५ चौकारांच्या मदतीने चमकदार ९२ धावा केल्या. ली पॉलने चांगली कामगिरी केली. तिने ७ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या.
भारताने ३४.३ षटकांत सामना जिंकला
आयर्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३४.३ षटकांत सामना जिंकला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्यात एक मजबूत भागीदारी झाली. मानधनाने ६ चौकार आणि १ षटकारासह ४१ धावा केल्या. तर प्रतिकाने १० चौकार आणि १ षटकारासह ८९ धावा केल्या. तेजल हसबनीस ही पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तेजलने नाबाद अर्धशतक झळकावले. तेजलच्या या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. तिने ५३ धावा केल्या. तेजलचे हे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. रिचा घोष ८ धावांवर नाबाद राहिली.
प्रिया मिश्राची शानदार गोलंदाजी
भारताकडून प्रिया मिश्राने शानदार गोलंदाजी केली. तिने ९ षटकांत ५६ धावा देत २ बळी घेतले. तितास साधू आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दीप्ती शर्मालाही १ यश मिळाले.