
मुंबई : अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत सायनच्या गौरिदत्त मित्तल विद्यालयाने मुलांच्या गटात तर वडाळ्याच्या एसआयईएस विद्यालयाने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मुलांमध्ये आंध्र विद्यालयाचा राज गुप्ता आणि मुलींमध्ये डॉ आंबेडकर हायस्कूलची ईशा डिगे यांची निवड करण्यात आली. दोन्ही खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
अंतिम सामन्याचा थरार
मुलांच्या गटात अंतिम सामन्यात सायनच्या गौरिदत्त मित्तल विद्यालय संघाने चुरशीच्या लढतीत माटुंग्याच्या आंध्र विद्यालयावर विजय मिळवला. आर्यन जाधवच्या अष्टपैलू खेळामुळे गौरिदत्त संघाने आपला विजय सुनिश्चित केला. आंध्र विद्यालयाच्या राज गुप्ताने उत्कृष्ट खेळ करत कडवी झुंज दिली.
मुलींच्या गटात एसआयईएस संघाने विक्रोळीच्या डॉ. आंबेडकर विद्यालयाचा सहज पराभव करत विजेतेपदाचा चषक उंचावला. स्नेहा पिसाळच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाने बाजी मारली. डॉ आंबेडकर संघाकडून ईशा डिगेने जबरदस्त कामगिरी केली.
मुलांच्या गटात गौरिदत्त मित्तल विद्यालयाने सोशल सर्व्हिस संघाचा, तर आंध्र विद्यालयाने मारवाडी हायस्कूलचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. मुलींच्या गटात एसआयईएसने सोशल सर्व्हिसला, तर डॉ आंबेडकर विद्यालय संघाने आंध्र हायस्कूलला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
खेळाडूंचा सन्मान
मुलांचा गट : उत्कृष्ट चढाई खेळाडू : सोशल सर्व्हिसचा आर्यन जाधव, उत्कृष्ट पकड खेळाडू : गौरिदत्त मित्तलचा सतीश शर्मा.
मुलींचा गट : उत्कृष्ट चढाई खेळाडू : एसआयईएसची स्नेहा पिसाळ, उत्कृष्ट पकड खेळाडू: डॉ आंबेडकर विद्यालयाची तन्वी कणेकर.