
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : व्योम खर्चे, अभिराम गोसावी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रीज स्कूल आणि एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल या संघांनी आपली विजयी आगेकूच कायम ठेवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यांमध्ये व्योम खर्चे आणि अभिराम गोसावी या खेळाडूंनी सामनावीर किताब पटकावला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात केम्ब्रीज स्कूल संघाने एमजीएम स्कूल संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या सामन्यात एमजीएम स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १७.४ षटकात सर्वबाद ५३ असे छोटे लक्ष्य उभे केले. मयुरेश औटे (९), अरिंधम वीर (७), वेदांत काटकर (७) यांनी थोडा प्रतिकार केला. अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले.
केम्ब्रीज स्कूल संघाकडून सर्व गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी नोंदवली. व्योम खर्चे याने १३ धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. अथर्व तोतला (२-६), ध्रुव देखणे (२-७) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सर्वेश पाटील (१-४) व शौर्य मित्तल (१-३) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
केम्ब्रीज स्कूल संघाला विजयासाठी अवघ्या ५४ धावांची आवश्यकता होती. केम्ब्रीज स्कूल संघाने ११.५ षटकात तीन बाद ५९ धावा फटकावत सात विकेट राखून सामना जिंकला व उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात व्योम खर्चे व स्पर्श पाटणी यांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. व्योम खर्चे याने दोन चौकार व एक षटकार ठोकत १८ धावा फटकावल्या. स्पर्श पाटणी याने एक षटकार व एक चौकार मारत २० धावांचे योगदान दिले. विवेक कोठारी (०) लवकर बाद झाला. समर्थ तोतला (८) व अथर्व तोतला (११) यांनी नाबाद खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
एमजीएम स्कूल संघाकडून मधुर कचरे याने ११ धावांत दोन विकेट घेतल्या. मुफद्दल टाकसाळी याने २१ धावांत एक गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल संघाने ऑर्किड इंग्लिश स्कूल संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय साकारला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑर्किड इंग्लिश स्कूल संघाने १७.५ षटकात सर्वबाद ७१ धावा काढल्या. एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल संघाने अवघ्या ४.३ षटकात बिनबाद ७२ धावा फटकावत दहा गडी राखून मोठा विजय साकारला.
ऑर्किड स्कूल संघाने प्रथम फलंदाजी करताना १७.५ षटकात सर्वबाद ७१ धावा काढल्या. प्रेम कासुरे याने सर्वाधिक ३३ धावा काढल्या. त्याने सहा चौकार मारले. अर्जुन राजपूत याने दोन चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.
एंजल किड्स स्कूल संघाच्या रुतुराज काळे याने १३ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. अभिराम गोसावी याने सहा धावांत तीन विकेट मिळवल्या. हर्षद शिंदे याने १६ धावांत दोन बळी टिपले. ओमकार कर्डिले याने ११ धावांत एक बळी घेतला.
एंजल किड्स स्कूल संघाने अवघ्या ४.३ षटकात बिनबाद ७२ धावा फटकावत शानदार विजय साकारला. पृथ्वीराज चौरे व अभिराम गोसावी या सलामी जोडीने तुफानी फलंदाजी करत मैदान गाजवले. पृथ्वीराज चौरे याने १४ चेंडूत नाबाद ३३ धावा फटकावल्या. त्याने सात चौकार ठोकले. अभिराम गोसावी याने १३ चेंडूत नाबाद ३२ धावा काढल्या. त्याने सात चौकार लगावले.
रविवारचे उपांत्यपूर्व सामने
देवगिरी ग्लोबल अकॅडमी विरुद्ध पीएसबीए स्कूल (सकाळी ९ वाजता)
एसएफएस स्कूल विरुद्ध वूड रिज हायस्कूल (दुपारी १२.३० वाजता)