
ठाणे : ठाणे येथे झालेल्या योनेक्स सनराइज महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांनी दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांनी ६५ वर्षांवरील गटात दुहेरी प्रकारात विजेतेपद संपादन केले. पूर्णपात्रे व सुखटणकर या जोडीने अंतिम सामन्यात मुंबईच्या कुमार हिंदुजा व रमण व्यंकटेश्वरन या जोडीचा १९-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव करुन अजिंक्यपद मिळवले. पहिला गेम गमावल्यानंतर पूर्णपात्रे व सुखटणकर या जोडीने नंतरचे दोन्ही गेम जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

ही स्पर्धा ठाणे शहर व ठाणे जिल्हा यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या प्रसंगी मिलिंद पूर्णपात्रे यांनी गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने उत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच प्रशिक्षक व संघटक म्हणून बॅडमिंटन खेळाचा प्रसार करण्यास हातभर लावला त्याबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांत वाड यांच्या हस्ते मिलिंद पूर्णपात्रे यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.