
मुंबई : भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या त्रासामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता धुसर बनली आहे. सद्यस्थितीत बुमराह ग्रुप स्टेजमधील सामन्यात खेळू शकणार नाही असे वृत्त समोर आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी हा महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धेत जसप्रीत बुमराह सारखा मुख्य वेगवान गोलंदाज संघाबाहेर असणे भारतीय संघासाठी खूप त्रासदायक ठरू शकते. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्कॅनसाठी गेला होता. तेव्हापासून बुमराहच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौथ्या डावात बुमराह गोलंदाजी देखील करू शकला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह होते, पण कदाचित आता निवडकर्त्यांना त्याचे उत्तर सापडले आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तंदुरुस्त होऊ शकतो, याचा अर्थ असा की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ग्रुप स्टेज सामन्यांना मुकेल. बुमराहच्या पाठीवर सूज आहे. त्यामुळे तो या त्रासातून बरा होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्याची अपेक्षा आहे. एनसीएमध्ये वेळ घालवल्यानंतर भारतीय गोलंदाजाला फिटनेस प्रमाणपत्राची देखील आवश्यकता असेल आणि त्याला एक किंवा दोन सराव सामने देखील खेळावे लागतील.
अहवालात एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, ‘बुमराह पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये जाईल. सुरुवातीच्या अहवालात असे म्हटले आहे की त्याला फ्रॅक्चर नाही पण त्याच्या पाठीत सूज आहे. त्यामुळे एनसीए त्याच्या पुनर्प्राप्तीवर लक्ष ठेवेल आणि तो तिथेच दोन आठवड्यांसाठी राहील. पण त्यानंतरही त्याला एक किंवा दोन सामने खेळावे लागतील, जरी ते सराव सामने असले तरी त्याचा फिटनेस तपासणीसाठी सामने असतील.