
बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत सचिवपदी निवड
मुंबई : आसामचे माजी यष्टिरक्षक फलंदाज देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव म्हणून निड झाली आहे. सैकिया हे जय शाह यांची जागा घेणार आहेत.
बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत देवजीत सैकिया यांची सचिवपदी नियुक्ती निश्चित करण्यात आली. तसेच प्रभतेज सिंग भाटिया यांची नवीन कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सैकिया व प्रभतेज यांना अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्ष पदासाठी बिनविरोध नामांकन देण्यात आले. नामांकनानंतjर दोघांचीही नियुक्ती निश्चित झाली होती. विशेष सर्वसाधारण सभेत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आयसीसीच्या नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जय शाह यांनी १ डिसेंबर रोजी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी घटनेतील त्यांच्या अधिकारांचा वापर करून देवजीत सैकिया यांना अंतरिम सचिवपद दिले होते. बीसीसीआयमध्ये कोणतेही पद रिक्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत त्यावर नवीन नियुक्ती करणे बंधनकारक आहे. सैकिया आता जय शाह यांच्या जागी नवीन सचिव बनले आहेत, तर प्रभतेज सिंग भाटिया यांनी आशिष शेलार यांची जागा घेतली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आशिष यांनी कोषाध्यक्षपद सोडले होते. असो, त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून त्यांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले होते.
नवीन सचिव देवजीत सैकिया यांचे पहिले काम बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासोबत भारतीय संघाच्या आढावा बैठकीत सहभागी होणे होते. या आढावा बैठकीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही भाग घेतला. काही सूत्रांनुसार, ही बैठक सुमारे २ तास चालली. त्यामध्ये विशेषतः कसोटी सामन्यांमधील भारताच्या कामगिरीवर सखोल चर्चा झाली.
देवजीत सैकिया हा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे, तो मूळचा आसामचा आहे. १९९० ते १९९१ दरम्यान त्याने एकूण ४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ते यष्टिरक्षक म्हणून खेळले. या ४ सामन्यांमध्ये त्यांनी ५३ धावा केल्या आणि यष्टिरक्षक म्हणून ९ बळी घेतले आहेत.