भारतीय महिला टीमने रचला नवा इतिहास

  • By admin
  • January 12, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

जेमिमाचे वादळी शतक, भारताचा ३७० धावांचा डोंगर 

राजकोट : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने स्वतःचाच विक्रम मोडला. भारतीय संघाने त्यांची सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या रचली. भारताने पाच बाद ३७० असा धावांचा डोंगर उभारला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने शतक झळकावले. तर हरलीन देओल, प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी धमाकेदार अर्धशतकं झळकावली.

राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करायला आला. कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी डावाची सुरुवात आक्रमक केली. या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली. प्रतिका ६७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर मानधनाने ७३ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर हरलीन देओल हिने १२ चौकारांच्या मदतीने ८९ धावांची तुफानी खेळी साकारली.

जेमिमाने दमदार शतक ठोकले
भारताकडून जेमिमा रॉड्रिग्ज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरली. यादरम्यान तिने ९१ चेंडूंचा सामना केला आणि १०२ धावांची वादळी खेळी केली. जेमिमाच्या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. रिचा घोषने १० धावांचे योगदान दिले. तर तेजल हसबनीस २ धावा करून नाबाद राहिला. 

भारताने विक्रम मोडला 
भारतीय महिला संघाने राजकोटमध्ये एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या केली. भारताने ३७० धावा केल्या. भारतीय महिला संघ सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याच्या बाबतीत १५ व्या क्रमांकावर आहे. भारताने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध ३५८ धावा केल्या होत्या. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोअर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *