
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : राघव नाईक, रितेश कलोड, तनिष पवार चमकले
छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत देवगिरी ग्लोबल अकॅडमी आणि वूड रिज हायस्कूल या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यांमध्ये राघव नाईक आणि तनिष पवार यांनी सामनावीर किताब संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने पीएसबीए स्कूल संघावर १९ धावांनी विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात तीन बाद २०१ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. सलामीवीर राघव नाईक याने तुफानी शतक ठोकले. राघवने ७५ चेंडूंचा सामना करताना १२१ धावांची धमाकेदार खेळी केली. राघवने सात उत्तुंग षटकार व १३ चौकार मारले. संस्कार मुथा याने ३० चेंडूत नाबाद ५६ धावा फटकावत डावाला आकार दिला. त्याने दोन षटकार व सात चौकार मारले. आर्यन बन्सल १५ धावांवर बाद झाला.
पीएसबीए स्कूल संघाकडून अनिकेत मुर्गे याने ३२ धावांत दोन विकेट घेतल्या. प्रज्ञेश सोनवणे याने ३७ धावांत एक बळी मिळवला.
पीएसबीए स्कूल संघाने या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात सात बाद १८२ धावा काढल्या. सलामीवीर रितेश कलोड याने ५९ चेंडूत ११३ धावांची वादळी खेळी करत सामन्यात रोमांच आणला. रितेशने सात टोलेजंग षटकार व १३ चौकार मारले. अर्णव मांगरुळकर याने १७ धावांचे योगदान दिले. अ्न्य फलंदाज लवकर बाद झाले. त्यामुळे रितेशची शतकी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
देवगिरी ग्लोबल अकॅडमीकडून सुशांत यादव याने २१ धावांत तीन गडी बाद करुन विजयाला मोलाचा हातभार लावला. स्वराज रणसिंग याने २७ धावांत दोन विकेट घेतल्या. संस्कार मुथा (१-१५), कृष्णकांत (१-१४) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात वूड रिज हायस्कूल संघाने एसएफएस स्कूल संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. एसएफएस स्कूल संघाने सात बाद १२० धावा काढल्या. वूड रिज हायस्कूलने १४व्या षटकात तीन बाद १२६ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला.
एसएफएस स्कूलने २० षटकात सात बाद १२० धावसंख्या उभारली. दीपक शर्मा याने सर्वाधिक २७ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. ऋषिकेश डोंगरे याने एक षटकार व तीन चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. सोलोमन याने २२ धावा काढताना एक षटकार व दोन चौकार मारले. अरुण चव्हाण याने १२ धावा तर सौरभ धांडे याने ७ धावांचे योगदान दिले.
वूड रिज हायस्कूल संघाकडून तनिष पवार (२-२२) व साहस पाटील (२-२५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पौरस मिसाळ याने १३ धावांत एक बळी मिळवला.
वूड रिज हायस्कूल संघासमोर विजयासाठी १२१ धावांचे आव्हान होते. वूड रिज हायस्कूलने १३.३ षटकात तीन बाद १२६ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. राजवर्धन देशमुख व राजवीर मुळे या सलामी जोडीने आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला. राजवर्धन याने २० चेंडूत ३० धावा काढल्या. त्याने सहा चौकार मारले. राजवीर याने पाच चौकारांसह ३८ धावांची वेगवान खेळी केली. समरवीर पाटील याने दोन चौकार ठोकत २१ धावा काढल्या. तनिष पवार याने नाबाद १६ धावा काढल्या. पौरस मिसाळ ८ धावांवर नाबाद राहिला. सोलोमन याने २६ धावांत दोन गडी बाद केले. ऋषिकेश याने २७ धावांत एक बळी घेतला.
मंगळवारी उपांत्य सामने
१४ जानेवारी रोजी या स्पर्धेतील उपांत्य सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना केम्ब्रिज स्कूल आणि देवगिरी ग्लोबल अकॅडमी (सकाळी ९ वाजता) आणि दुसरा सामना एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल आणि वूड रिज हायस्कूल (दुपारी १२.३० वाजता) होणार आहे, अशी माहिती स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे यांनी दिली. हे दोन्ही उपांत्य सामने एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.