
‘अंडर १९ क्रिकेट सामन्यातील मानसिकतेने खेळल्याने मिळाले यश’
राजकोट : १९ वर्षांखालील क्रिकेट सामने खेळताना माझी जी मानसिकता आणि पद्धत होती त्याचा अवलंब केल्यामुळे मला शतक साजरे करता आले असे भारताची स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने सांगितले.
मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्ज ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघातून खेळत आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिले शतक साजरे करण्यासाठी जेमिमाहला तब्बल सात वर्षे लागली. जेमिमाहच्या आक्रमक शतकामुळे भारतीय संघाने विक्रमी ३७० धावसंख्या उभारली. त्यामुळे भारताने आयर्लंड संघाचा ११६ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅट मध्ये पहिले शतक झळकावल्यानंतर जेमिमाह म्हणाली की, ‘खूप छान वाटते. मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होतो. संघासाठी मी हे करू शकले याचा मला आनंद आहे. मी अंडर १९ क्रिकेटमध्ये अनेक शतकी खेळी खेळल्या आहेत आणि तिथे २०० धावाही केल्या आहेत. अशा परिस्थितीत, मी त्यावेळी जे करायचे ते करण्याचा प्रयत्न करत होते. आज मी हे चांगल्या प्रकारे करण्यात यशस्वी झाले.’
२०१७ मध्ये १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत सौराष्ट्राविरुद्ध मुंबईकडून नाबाद २०२ धावा काढल्याने जेमिमाह चर्चेत आली होती. ती सहसा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करते पण नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत तिला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तिने ९१ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार मारून शतक साजरे केले.