
पहिल्याच सामन्यात चार विकेट घेत भूमिका चव्हाण सामनावीर
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने मिझोराम महिला संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या सामन्यात छत्रपती संभाजीनगरची क्रिकेटपटू भूमिका चव्हाण हिने पदार्पण करताना २९ धावांत चार विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे भूमिकाने पहिल्याच सामन्यात सामनावीर किताब देखील पटकावला.
सुरत येथील विशाल क्रिकेट मैदानावर महाराष्ट्र आणि मिझोराम यांच्यात सामना झाला. मिझोराम महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्वबाद ९२ असे माफक लक्ष्य उभारले. त्यात जॅसिंटा (२१), संध्या (२१) यांनी सर्वाधिक धावा काढल्या. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
भूमिका चव्हाणची प्रभावी कामगिरी
छत्रपती संभाजीनगर येथील क्रिकेटपटू भूमिका चव्हाण हिने या सामन्यातून पदार्पण केले. पहिला सामना खेळताना भूमिका चव्हाण हिने २९ धावांत चार विकेट घेत सामना संस्मरणीय बनवला. या चमकदार कामगिरीमुळे भूमिकाला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूमिकाला प्रशिक्षक आदित्य नाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. श्रुती महाबळेश्वरकर हिने १३ धावांत दोन गडी बाद केले. जान्हवी वीरकर (१-१३), आचल अग्रवाल (१-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
महाराष्ट्र महिला संघासमोर विजयासाठी केवळ ९३ धावांचे लक्ष्य होते. महाराष्ट्र संघाने १८.३ षटकात दोन बाद ९३ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला. साक्षी शिंदे आणि आमनी नंदल या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करताना ३४ धावांची भागीदारी केली. आमनी २६ चेंडूत ३० धावा काढून बाद झाली. तिने पाच चौकार मारले. त्यानंतर साक्षी शिंदे व मयुरी थोरात या जोडीने संघाचा विजय निश्चित केला. मयुरी पाच चौकारांसह ३१ धावांवर बाद झाली. सलामीवीर साक्षी शिंदे हिने नाबाद २७ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साक्षीने तीन चौकार मारले. श्रद्धा गिरमे (१) नाबाद राहिली.
मिझोराम संघाकडून जॅसिंटा (१-२८) व जोथन सांगी (१-२६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.