
कर्णधार खुशी मुल्लाची अष्टपैलू कामगिरी
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने अरुणाचल महिला संघाचा दहा विकेट राखून पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. कर्णधार खुशी मुल्ला हिने अष्टपैलू कामगिरी बजावली.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र आणि अरुणाचल यांच्यात सामना झाला. अरुणाचल प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद ६५ धावा काढल्या. सरडूम (१०), टाकम रिनिउ (१०), येकार (नाबाद १०) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला.
महाराष्ट्र महिला संघाकडून खुशी मुल्ला हिने ११ धावांत दोन विकेट घेत प्रभावी कामगिरी बजावली. समृद्धी दाढे हिने ११ धावांत एक बळी घेतला.
महाराष्ट्र महिला संघाने अवघ्या ६.२ षटकात बिनबाद ६६ धावा फटकावत दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार खुशी मुल्ला व ईश्वरी सावकर या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. खुशी मुल्ला हिने २३ चेंडूत नाबाद ४५ धावा फटकावल्या. तिने नऊ चौकार मारले. ईश्वरी सावकर हिने दोन चौकारांसह नाबाद १७ धावा काढल्या.