भारतीय खो-खो संघाची ऐतिहासिक सुरुवात 

  • By admin
  • January 13, 2025
  • 0
  • 64 Views
Spread the love

सलामीच्या सामन्यात नेपाळ संघावर पाच गुणांनी विजय; उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते उद्घाटन  

बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली ः पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ संघाचा ४२-३७ अशा फरकाने पराभव करुन ऐतिहासिक सुरुवात केली. महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकर याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला विजयी सुरुवात करुन दिली. भारताचा आदित्य गणपुले हा सामन्याचा मानकरी ठरला. तसेच शिवा रेड्डी आणि रोहित कुमार यांनाही उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

सोमवारी झालेल्या भारत आणि नेपाळ यांच्यातील सलामीचा सामना चांगलाच चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत भारताने नेपाळ संघाविरुद्ध २४-२० अशी छोटीशी आघाडी घेतली होती. नेपाळ संघाने भारताचा फेस काढला. अनुभवी भारताच्या खेळाडूंपुढे नेपाळने तगडे आव्हान निर्माण केले होते. मार्च २०२३ मध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेत देखील नेपाळने भारताला अंतिम सामन्यात चांगली लढत दिली होती. आज पुन्हा एकदा या पहाडी मुलांनी कमालीचा खेळ करत भारतासमोर तगड आव्हान निर्माण केले होते यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी भारताने ४२-३७ असा काठावर विजय मिळवत भारताने संघर्षपूर्ण विजयी सलामी दिली.

शानदार रंगारंग उद्घाटन सोहळा  

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा देखील उपस्थित होत्या. यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव व महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

या स्पर्धेत २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी उद्घाटन प्रसंगी संचालनात भाग घेतला व संपूर्ण मैदानाला फेरी मारून उत्साह वाढवणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. या संचालनात भारतीय महिला खेळाडूंनी साडी परिधान करून आपल्या देशाची परंपरा व संस्कृती जपत एक वेगळा संदेश दिला. यावेळी भारताचे कर्णधार प्रतिक वाईकर व प्रियांका इंगळे यांनी शपथ घेतली. त्यावेळी इतर देशांच्या कर्णधारांनी त्यांच्या मागे उभे राहून शपथ घेतली. तसेच भारत आणि नेपाळ सामन्यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. 

मंगळवारी होणारे सामने

पुरुष गट (सकाळी १०.३० पासून) : साऊथ आफ्रिका-घाना, बांगलादेश- श्रीलंका, इंग्लंड-जर्मनी, घाना-नेदरलँडस , पेरू- भूतान,अर्जेंटिना-इराण, दक्षिण कोरिया- पोलंड, मलेशिया- केनिया, दक्षिण आफ्रिका नेदरलँडस, बांगलादेश-अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, नेपाळ- पेरू, घाना-अर्जेंटिना, भारत-ब्राझील (रात्री ८.१५).

महिला गट (सकाळी ११.४५ पासून) : इंग्लंड- ऑस्ट्रेलिया, नेपाळ- भूतान, दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड, श्रीलंका-बांगलादेश, केनिया- नेदरलँडस, इंग्लंड-युगांडा, भारत-दक्षिण कोरिया (रात्री ७ वाजता), दक्षिण आफ्रिका-पेरू, नेपाळ-जर्मनी, इराण-मलेशिया (रात्री ७.४५).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *