
पुणे : निनाद कुलकर्णी, अथर्व खिस्ती, सुदीप खोराटे यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर ५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित निनाद कुलकर्णीने प्रद्युम्न खंदाडेवर २१-१३, २१-१७ असा, तर चौथ्या मानांकित अथर्व खिस्तीने सुजल लखारीवर २१-१६, २१-१५ असा विजय मिळवला. यानंतर सुदीप खोराटेने विवेक चंद्रवंशीचे आव्हान २१-९, २१-९ असे सहज परतवून लावले. दुस-या मानांकित वसीम शेखला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने दिग्विजयसिंह राजपूतवर २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अग्रमानांकित अर्हम रेदासानीने पाचव्या मानांकित श्रेयस मासळेकरला २१-१६, २१-१६ असे नमविले. यानंतर विहान कोल्हाडेने सातव्या मानांकित अजिंत्य जोशीला २२-२०, २१-१९ असा पराभवाचा धक्का दिला. चौथ्या मानांकित विहान मूर्तीने चिन्मय फणसेला २१-८, २२-२० असे नमविले.