
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी रामजी कश्यपची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. सलामीच्या नेपाळ संघाविरुद्धच्या सामन्यात पहिली स्काय डाइव्ह व पहिली विकेट रामजी कश्यपच्या नावावर होती. त्याच्याबद्दल…
– अजितकुमार संगवे, सोलापूर.
…..

आई-वडील व्यवसायाच्या शोधात उत्तर प्रदेशमधून सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे आले. येथे वास्तव्यास आल्यापासून गेली तीस वर्षापासून छापडी (पुठ्ठा) गोळा करण्याचा व्यवसाय कुटुंब करत आहे. या कुटुंबातील रामजी कश्यप.
रामजीने वेळापूर येथे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून घेतले. त्यानंतर इंग्लिश स्कूल वेळापूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे खऱ्या अर्थानं त्याच्या खेळाची सुरुवात झाली कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची. वडील हरिचंद्र, आई कमल, भाऊ रामनारायण, अजय, बहिण अंजली आणि रामजी असा हा परिवार रोज गावातून छापडी गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवायचा.
वयाच्या तेराव्या वर्षापासून खो-खो खेळण्याची आवड रामजीला निर्माण झाली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते व क्रीडा शिक्षक नारायण जाधव यांनी रामजी मधील खो-खो खेळाविषयी असलेली आवड व त्याच्यामधील कौशल्य ओळखले तसेच क्रीडा शिक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो खेळाच्या सरावाला सुरुवात झाली. परंतु आई-वडिलांकडून खेळाला विरोध होता. सरावाला जात असल्याने व्यवसाय बंद पडत होता. कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे सरावास पाठवू शकत नाही असा साफ नकार त्याच्या आई वडिलांनी दिला. त्यावेळी नारायण जाधव व सतीश कदम यांनी कश्यप कुटुंबीयांच्या घरी जाऊन वेळोवेळी समजूत काढली, आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली. त्याच्या कुटूंबाला शैक्षणिक खर्चाचेही आश्वासन देऊन रामजीला खेळण्यास प्रवृत्त केले.
तिथून खऱ्या अडचणीतून मार्ग निघाला व यशाची सुरवात झाली. अर्धनारी नटेश्वर खो-खो क्लबचे अध्यक्ष जावेद मुलाणी, प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे, शिवाजी जाधव, जावेद आतार व श्रीनाथ खटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची कामगिरी बहरत आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार त्याने सलग दोन वेळा मिळवला. ११ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने १० सुवर्ण तर १ रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याने सलग दोन वर्षे अल्टीमेट खो खो लीगमधील ‘टुर्नामेंट ऑफ द बेस्ट प्लेअर’चा पुरस्कार मिळवला. खेळातील कामगिरीमुळे सध्या तो सेंट्रल रेल्वे मध्ये टीसी पदावर काम करत आहे . सेंट्रल रेल्वेला इंटर रेल्वे स्पर्धेत ३० वर्षांनंतर प्रथमच त्याने विजेतेपद मिळवून दिले. यामध्ये त्याला बेस्ट प्लेअरचा पुरस्कार मिळाला. धाराशिव येथे झालेल्या पुरुष खो खो स्पर्धेत त्यास उत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळाला.