केम्ब्रिज स्कूल, वूडरिज हायस्कूल अंतिम फेरीत 

  • By admin
  • January 14, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : अथर्व तोतला, समरवीर पाटील सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांत केम्ब्रिज स्कूल आणि वूडरिज हायस्कूल या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवत अंतिम फेरी गाठली आहे. या लढतीत अथर्व तोतला आणि समरवीर पाटील यांनी सामनावीर किताब पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात केम्ब्रिज स्कूल संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १२३ असे माफक लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात केम्ब्रिज स्कूल संघाने १५.४ षटकात दोन बाद १२९ धावा फटकावत आठ विकेट राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात व्योम खर्चे (६२), राघव नाईक (४०), समर्थ तोतला (३८) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. अथर्व तोतला याने २२ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. कृष्णकांत पावडे (२-३७) व आर्यन खेडकर (१-१५) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल संघाने २० षटकात नऊ बाद ९८ धावसंख्या उभारली. वूडरिज हायस्कूल संघाने १९.१ षटकात पाच बाद ९९ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकून अंतिम फेरीत गाठली.

या सामन्यात ओमकार कर्डिले (४६), समरवीर पाटील (४२), राजवर्धन देशमुख (१५) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत निशाद जोशी याने १६ धावांत चार विकेट घेत आपली छाप पाडली. समरवीर पाटील याने १५ धावांत तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. हर्षद शिंदे याने १५ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : १) देवगिरी ग्लोबल अकॅडमी : २० षटकात नऊ बाद १२३ (राघव नाईक ४०, आर्यन बन्सवाल २०, स्वराज रणसिंग ५, सर्वज्ञ राजुरे १०, हर्ष चौरे ९, कबीर लांडगे ५, कृष्णकांत पावडे नाबाद ७, इतर २५, अथर्व तोतला ४-२२, ध्रुव देखणे १-३३, व्योम खर्चे १-२४, सर्वेश पाटील १-२०, आर्यन खेडकर १-१५) पराभूत विरुद्ध केम्ब्रिज स्कूल : १५.४ षटकात दोन बाद १२९ (व्योम खर्चे नाबाद ६२, स्पर्श पाटणी १२, विवेक कोठारी १३, समर्थ तोतला नाबाद ३८, कृष्णकांत पावडे २-३७). सामनावीर : अथर्व तोतला.  

२) एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल : २० षटकात नऊ बाद ९८ (रुतुराज काळे ५, ओमकार कर्डिले नाबाद ४६, वेद शर्मा १०, मानव थोरात १२, इतर १५, निशाद जोशी ४-१६, समरवीर पाटील ३-१५, तनिष पवार १-१८) पराभूत विरुद्ध वूडरिज हायस्कूल : १९.१ षटकात पाच बाद ९९ (राजवर्धन देशमुख १५, पौरस मिसाळ ६, समरवीर पाटील नाबाद ४२, तनिष पवार ९, दक्ष सिंघवी नाबाद १२, हर्षद शिंदे २-१५, आदित्य पालवडे २-१६, अभिराम गोसावी १-१९). सामनावीर : समरवीर पाटील.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *