
बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप आणि २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक या प्रमुख स्पर्धांमध्ये खो-खो खेळाचा समावेश करण्याचा भारतीय खो-खो महासंघाचा मानस असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुधांशू मित्तल यांनी ही माहिती दिली.
सुधांशू मित्तल म्हणाले, ‘खो-खो हा खेळ सध्या ५५ देशांमध्ये खेळला जात आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी हा खेळ ७५ देशांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट आहे की, ९० देशांमध्ये हा खेळ पोहोचवून त्याचा अधिकाधिक विस्तार करायचा. जेणेकरून आम्हाला ऑलिम्पिक मध्ये सहज सहभाग मिळेल.’
सर्वाधिक देश सहभागी असलेला विश्वचषक
यापूर्वी कोणत्याही खेळचा विश्वचषक सुरू (पहिला) होताना १४ पेक्षा अधिक देशांचा सहभाग नव्हता. खो-खो खेळाने एक नवीन विश्वविक्रम करीत या पहिल्याच विश्वचषकात २३ देशांचा सहभाग झाला आहे. तसेच पुरुषांचे २० तर महिलांचे १९ संघ या स्पर्धेत खेळत आहेत हा देखील एक विश्वविक्रमच आहे.
खो-खोच्या प्रगतीचा इतिहास
सुधांशू मित्तल यांनी खो-खो खेळाच्या वाढीसाठी झालेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. आज पहिला खो-खो विश्वचषक साकारत आहे, ही संपूर्ण खो-खो कुटुंबाची मोठी मेहनत आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटक व संघटनांच्या अथक प्रयत्नांमुळे हा खेळ आता घराघरांत पोहोचत आहे. केंद्र शासनाने तीन हजार खेळाडूंना नोकरीची संधी दिली असून, अल्टिमेट खो-खो लीगने हा खेळ लोकप्रिय केला आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
भारताचा कर्णधार प्रतीक वाईकर यांनी सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘पहिलाच सामना असल्यामुळे संघावर थोडे प्रेशर होते. सामना लाईव्ह असल्याने संपूर्ण जग पाहत होते. नेपाळने अप्रतिम खेळ केला. त्यामुळे आमच्यावर दबाव निर्माण झाला. आमच्या आक्रमणात काही कमतरता होत्या आणि संरक्षणातही सुधारणा करण्याची गरज आहे. पण इतर संघांना आम्ही हेच सांगू की ‘टीम इंडिया’ से बचके रहना!’
प्रशिक्षक अश्विनी कुमार शर्मा म्हणाले, ‘प्रेक्षकांचा जोश जबरदस्त होता. पुढील सामन्यांमध्ये आम्ही चुका सुधारू व आम्हाला अजून मोठे विजय मिळवायचे आहेत हे स्पष्ट केले.
खो-खोचा जागतिक विस्तार आणि भवितव्य
पहिल्या खो-खो विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनासोबतच हा खेळ जागतिक व्यासपीठावर स्वतःची जागा निर्माण करत आहे. महासंघाच्या या पुढाकारामुळे खो-खो खेळासाठी नव्या संधी आणि आव्हाने समोर येत आहेत.