बारामती येथे बुधवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगणार 

  • By admin
  • January 14, 2025
  • 0
  • 51 Views
Spread the love

राज्यातील एकूण ३२ संघांचा सहभाग, ४४.६० लाखांची पारितोषिके 

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या २३व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामती शहर सज्ज झाले आहे. १५ ते १९ जानेवारी या कालावधीत बारामतीत कबड्डीचा थरार रंगणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन व राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल.

या स्पर्धेसाठी अत्याधुनिक मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असून प्रेक्षकांच्या करीता भव्य बैठक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून दुपारी चार ते रात्री आठ रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत. २०१२ पासून कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, नागपूर, अहिल्यानगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन झालेले आहे. बारामती शहराला दुसऱ्यांदा कबड्डी स्पर्धा आयोजनांचा बहुमान प्राप्त झालेला आहे. यापूर्वी सन २००९-१० मध्ये या स्पर्धेंचे दिमाखदार आयोजन बारामती शहरात केलेले होते.

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये खेळाडूंना ४४.६० लाखांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम १२ संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम ४ असे एकूण १६ महिला व १६ पुरुष असे एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत एकूण ३२ संघामधील खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रिक अधिकारी मिळून अंदाजे ५४८ व्यक्ती सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा असे एकूण पुणे जिल्ह्याचे ३ संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अधिकची संधी यामुळे प्राप्त होणार आहे.

प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत प्रो कबड्डी स्टार अजित चौहान, शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे, दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपूर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी पुणे जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना प्राप्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *