
ऑलिम्पियन कविता राऊत आणि दत्तू भोकनळ यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : क्रीडा संस्कृती फाउंडेशन, मराठा महासंघ आणि लाख मराठा महासंघ आणि उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१५ जानेवारी) महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांमध्ये उत्तम प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक यांना गौरवण्यात येणार आहे.
१५ जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे. खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक मध्ये कुस्ती या खेळामध्ये पाहिले वैयक्तिक मेडल मिळवून दिले होते. त्यांचा जन्म दिवस हा गेल्या वर्षीपासून सरकारी आदेशा प्रमाणे महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. परंतु आमच्या या संस्थांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. या सर्व कार्यक्रमाला खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव हे आवर्जून उपस्थित राहत आहेत. आमच्या आणि रणजित जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेवून हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून मागील वर्षी जाहीर केला आहे.
आपल्या मराठी ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीराचा गौरव व्हावा आणि त्यांची प्रेरणा घेवून तरुण खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवले हाच एकमेव उद्देश या उपक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.