२०१२ नंतर विराट कोहली रणजी सामना खेळणार

  • By admin
  • January 15, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग समवेत खेळला होता शेवटचा रणजी सामना 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब फॉर्ममुळे बरीच टीका सहन करावी लागल्यानंतर आता विराट कोहली पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसेल. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या समवेत विराट कोहली शेवटचा रणजी सामना खेळला होता हे विशेष. २०१२ नंतर पुन्हा एकदा कोहली रणजी सामन्यात खेळताना दिसणार आहे. 

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अशोक शर्मा यांनी विराट कोहलीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे नाव समाविष्ट आहे. शेवटच्या वेळी जेव्हा तो दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी सामना खेळला होता, तेव्हा गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज खेळाडू देखील दिल्ली संघाचा भाग होते.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयने कडक भूमिका घेतली आणि स्पष्ट केले होते की प्रत्येक खेळाडूला वेळ मिळेल तेव्हा त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. त्यानंतर भारतीय संघातील अनेक दिग्गज आता रणजी सामन्यात खेळताना दिसणार आहे. सचिव अशोक शर्मा यांनी कोहलीला मुंबईच्या खेळाडूंकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात कोहली आणि ऋषभ पंत यांचाही समावेश करण्यात आला आहे.

विराट कोहलीचा शेवटचा रणजी सामना
विराट कोहलीने शेवटचा रणजी ट्रॉफी सामना २०१२ मध्ये उत्तर प्रदेश संघाविरुद्ध गाझियाबाद येथे खेळला होता. त्या सामन्यात दिल्लीकडून गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, इशांत शर्मा आणि आशिष नेहरा यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. उत्तर प्रदेश संघात मोहम्मद कैफ, सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमार सारखे खेळाडू होते.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने पहिल्या डावात फक्त २३५ धावा केल्या. विराटने १४ धावा केल्या आणि भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. पहिल्या डावात उत्तर प्रदेशने ४०३ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात वीरेंद्र सेहवागने शानदार शतक झळकावले तर विराट कोहलीने ४३ धावा केल्या. संपूर्ण संघ ३२२ धावा करून सर्वबाद झाला. उत्तर प्रदेशने ३९.२ षटकांत चार बाद १५८ धावा करून सहा विकेट्सने सामना जिंकला होता. 

ऋषभ पंत आठ वर्षांनी खेळणार 

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जवळजवळ आठ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अशोक शर्मा यांनी सांगितले की, पंतने २३ जानेवारीपासून राजकोट येथे होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध दिल्ली सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. पंतने शेवटचा रणजी ट्रॉफी २०१७-१८ च्या हंगामात दिल्लीकडून खेळला होता.

‘पंतने पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे आणि तो थेट राजकोटमध्ये संघात सामील होईल,’ असे डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. हर्षित राणा याची भारतीय टी २० संघात निवड झाली आहे, त्यामुळे तो उपलब्ध राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *