
मोहन अग्रवाल यांचे प्रतिपादन
वर्धा : ‘समाजात स्त्रियांना अजूनही एक कमजोर घटक समजून त्यांच्यावर नेहमीच अन्याय, अत्याचार होताना आपण बघत असतो. बरेचदा अनेक स्त्रिया, मुलींना वाटई प्रवृत्तीच्या लोकाकडून अपमानित व्हावे लागते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर होऊन त्या हताश होतात. स्त्रियांनी निरोगी, स्वस्त व स्वाभिमानी जीवन जगण्याकरिता वुशू सारख्या कलात्मक खेळ आत्मसात करुन स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम येथील चरखा सभागृहात नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कल्याणी मंगेश भोंगाडे हिला सन्मानित करताना अग्रवाल हे बोलत होते. ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित २२वी राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धा नांदेड येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.
या स्पर्धेत वर्धेची खेळाडू कल्याणी मंगेश भोंगाडे हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले. जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपच्या उद्घाटन प्रसंगी कल्याणीचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सेवाग्राम पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ अनुपमा गुप्ता, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धेचे इम्रान राही, सावंगी ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ संदीप श्रीवास्तव, डॉ दिलीप गुप्ता, नितीन नगराळे, कविता भगत, शेख दत्तू, क्रिष्णा ढोबळे, पराग पाटील आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कल्याणी भोंगाडे हिचे सतीश ईखार, संतोष सेलुकर, मोहन मोहीते, हरिष पाटील, विजय सत्याम, खेमराज ढोबळे हेमलताताई काळबांडे, सचिन झाडे, निखिल सातपुते, प्रवीण पेठे, सुनील चंदनखेडे, उमेश चौधरी, गंगाधर पाटील, भगवानदास आहुजा, प्रकाश खंडार, श्याम पटवा, संदीप वरकट, सुशांत जिवतोडे आदींनी अभिनंदन केले.
कल्याणी भोंगाडे हिला वर्धा जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक निलेश राऊत व मार्गदर्शक मंगेश भोंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.