
‘कामगिरीचे श्रेय पालकत्व स्वीकारलेल्या आमच्या गुरुंचे’
अजितकुमार संगवे

नवी दिल्ली : आपल्या मुलीनं शिक्षणाबरोबरच खेळात करिअर करावे, अशी आमचे वडील अप्पासाहेब आणि आई अनुराधा यांची इच्छा. मुलीच्या खो-खोमध्ये धाराशिव पूर्वीचे उस्मानाबाद राज्यात आघाडीवर. त्यामुळे त्यांनी मला उस्मानाबादला पाठविले. आम्ही काही मुली मूळच्या ग्रामीण भागातल्या आणि परजिल्ह्यातील. आमचे गुरू डॉ चंद्रजीत व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव हे मैदानावरील सर्वच मुलींना स्वतःच्या मुली मानतात. ते आमची आई-वडिलांसारखी काळजी घेतात. त्यामुळेच आमच्या कामगिरीचे श्रेय त्यांनाच जाते, असे बोलत होती विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी भारतीय खो-खो संघातून खेळणारी अश्विनी शिंदे.
आपल्या कामगिरीची यशोगाथा सांगताना अश्विनी म्हणते, ‘सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खंडोबाची वाडी हे आमचे गाव. घरात खेळाचे वातावरण. वडील कुस्तीपटू. भाऊ जयकुमार राज्य खेळाडू, मोठी बहीण किरण हिने ३ खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला. मी तिसरीत असताना खो-खोचा श्रीगणेशा केला. तेथे किशोर, महादेव गुंड, हरिदास शिंदे व महेश राऊत यांनी खो-खोची ओळख करून दिली. तेव्हा सोलापूरचे श्रीकृष्ण कोळी व मोहन राजपूत यांनी आम्हाला आमच्या गावी येऊन तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. पाचवीत असताना १४ वर्षाखालील गटात असोसिएशनची राज्य स्पर्धा सोलापूरकडून खेळले. मग वडिलांनी उस्मानाबादच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये सातवीत प्रवेश घेतला. याअगोदर माझी मोठी बहीण किरण आमच्याच गावच्या जान्हवी व ऐश्वर्या पेठे या तिथेच शिकत होते. धाराशिवमध्ये छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ येथे दररोज सकाळी व संध्याकाळी सराव चालतो. तेथे डॉ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बागल, अभिजीत पाटील, प्रभाकर काळे, विवेक कापसे हे सराव घेतात.’
आपल्या कामगिरीचा चढता आलेख सांगताना अश्विनी सांगते, ‘महाराष्ट्र संघातून खेळताना १४ राष्ट्रीय स्पर्धेतून १३ सुवर्ण व एक रौप्यची कमाई केली. त्यात तीन वेळा खेलो इंडिया स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील जानकी व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची देखील मानकरी ठरले. पहिल्याच वर्षी १४ वर्षांखालील गटाची पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण आणि भुवनेश्वरला दुसरी राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण मिळाले. माझ्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू संघात होते. परंतु उपांत्य व अंतिम सामन्यात माझी सर्वात चांगली कामगिरी झाली. त्यामुळे मला ‘जानकी’ पुरस्कार मिळाला. तोच माझा अविस्मरणीय व आनंदाचा क्षण.’
धाराशिवला एक अर्जुन, पाच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
राज्य स्पर्धेत महिला गटात धाराशिव तृतीय स्थानावर आहे. २००२-०३, २०१०-११ आणि २०१४-१५ मध्ये उपविजेते तर २००४-०५ आणि २००७-०८मध्ये अव्वल स्थानावर आहे. धाराशिवने राष्ट्रीय खेळाडू घडवण्यात द्विशतक पार केले आहे. त्यापैकी सुजाता शानमे, रोहिणी आवारे, सारिका काळे व सुप्रिया गाढवे या चौघींना शिवछत्रपती राज्य खेळाडू पुरस्कार आणि डॉ चंद्रजीत जाधव यांना मार्गदर्शक पुरस्कार. सारिका ही केंद्र शासनाच्या अर्जुन क्रीडा पुरस्काराची मानकरी. देशांतील सर्वोत्तम खेळाडूत १९ खो-खोपटू राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी. पुरस्कार मिळालेल्या या खेळाडूंना राज्य शासनाने नोकरीही दिली आहे.