
पुणे : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणूक तातडीने व्हावी याकरीता भारतीय ऑलिम्पिक संघटना व बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी बोलून त्वरित कारवाई करणे यांसह विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना देण्यात आले.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटाचा समावेश करणे व शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे राज्य शासन किंवा केंद्र शासनामार्फत सुसज्ज बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र व्हावे या सर्व विषयांकरिता शिक्रापूर येथे केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, विनोद कुंजीर (बॉक्सिंग कोच), योगेश सातव (बॉक्सिंग संघटक) व इतर पालक वर्ग यांनी लेखी निवेदन दिले.
या सर्व विषयांमध्ये सविस्तर चर्चा विनिमय करून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी या सर्व विषयांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे सर्व उपस्थित मान्यवरांना सांगितले.