
छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार सुरूवात
दोन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार लवकरच देणार : दत्ता भरणे
पुणे : कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि व्हॉलीबॉल या राज्य शासनाच्या वतीने आयोजित होणार्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना पुढील वर्षीपासून ७५ लाख ऐवजी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत बुधवारपासून (१५ जानेवारी) २३व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार सुरू झाला. या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजकांनी केलेल्या अतिशय देखण्या आणि नेटक्या आयोजनाने तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध झाले. विम्बल्डन स्पर्धेची आठवण व्हावी, अशी मैदानाची आसन व्यवस्था असल्याचे उपस्थित प्रेक्षक सांगत होते. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तुडूंब गर्दी करून वातावरणात रंग भरले.राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीताच्या मेजवानीने चार चांद लावले. मंत्रमुग्ध करणारी फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदिपक लेझर शोमुळे स्पर्धेच्या उद्घाटनाला नवी झळाळी मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे यांनी तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी मानले.
आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा व छ्त्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा या चार स्पर्धा राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. सुरुवातीला या स्पर्धांसाठी २५ लाख रुपये दिले जात होते. मग हा निधी वाढत वाढत ७५ हजार पर्यंत आला. मात्र, स्पर्धांना दर्जा आणखी वाढविण्यासाठी आगामी वर्षीपासून या चारही स्पर्धांना एक कोटी रुपयांना निधी मी आज जाहीर करतो, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. याचबरोबर यंदाच्या या कबड्डी स्पर्धेत खेळाडूंना २० लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार होती. आम्ही त्यात आणखी २५ लाख रुपयांची भर टाकली आहे. देशी खेळांना नवसंजीवनी देण्यासाठीही आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले.
दोन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार लवकरच देणार : दत्ता भरणे
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मागील वर्षी रखडले होते. मात्र, यावेळी २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन्ही वर्षांचे हे राज्य क्रीडा पुरस्कार या वर्षी लवकरच दिले जातील, अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी दिली. याचबरोबर महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मिशन ऑलिम्पिक, खेळाडूंची थेट नियुक्ती किंवा बालेवाडीतील ऑलिम्पिकमधील उभारणी अशी सर्वच कामे मार्गी लागली आहेत. एकूणच राज्य सरकार क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही क्रीडा मंत्र्यांनी सांगितले.