
पुणे : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची १०० वी जयंती बुधवारी पुणे येथे राष्ट्रीय क्रीडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली.
वारजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फिनिटी जिम्नॅस्टिक्स हाॅलमधील
कार्यक्रमात खाशाबांचे पोस्टर व खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देऊन नऊ राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अजित जरांडे, लेखक संजय दुधाणे, मानसी करमरकर, प्रवीण भैरवकर, मोहन जरांडे, अभिषेक मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन अजित जरांडे, संजय दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या आठवणींना उजाळा दिला. १९४८ मध्ये खाशाबा जाधव हे जहाजाचा प्रवास करून लंडन ऑलिम्पिकला गेले होते असे सांगून दुधाणे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि गुरूनिष्ठा असल्याने खाशाबांनी देशासाठी पहिले ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
अजीत जरांडे यांनी राज्य क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी करमरकर यांनी केले.