
जागा उपलब्ध करुन दिल्यास क्रिकेट स्टेडियम उभारू : संतोष बोबडे
सातत्यातून कुठलीही गोष्ट यशस्वी होते : पोलिस अधीक्षक यशवंतराव काळे
सेलू : नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सेलू येथे शानदार सुरुवात झाली. स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आदर्श बीड संघाने सलामीचा सामना जिंकून विजयी सलामी दिली.
नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर ही स्पर्धा होत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंतराव काळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ काका लहाने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड दत्तराव कदम, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, माधव लोकुलवार, डॉ अशोक नाईकनवरे, दिनकर वाघ, जिल्हा सचिव अब्दुल रहिम आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सहसचिव संतोष बोबडे म्हणाले की, ‘गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने चालणारी ही मराठवाड्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा असून या क्रिकेट स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. संदीप लहाने यांनी जमीन दिल्यास या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या वतीने एक सुंदर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येईल. याचा संपूर्ण खर्च राज्य संघटना वतीने करण्यात येईल असे सांगितले.
उद्घाटक अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे म्हणाले की, ‘सातत्यातून कुठलीही गोष्ट यशस्वी होते याचे ज्वलंत उदाहरण नितीन क्रीडा मंडळाने पंचवीस वर्षापासून चालवलेल्या क्रिकेट स्पर्धेचे आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ काका लहाने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदीप लहाने यांनी केले. या प्रसंगी संदीप लहाने यांच्यावतीने विविध क्रिकेट क्लबला गणवेश वाटप करण्यात आला. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षकांनाही आकर्षक सायकलचे बक्षीस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. प्रा नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख बाबा काटकर अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, गणेश माळवे, धनंजय कदम, हरिभाऊ काळे, छत्रगुन मगर, हमीद अब्दुल, बंडू देवधर, मोहनराजे बोराडे, क्रीडा शिक्षक राजेश राठोड, स्वप्नील राठोड, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
आदर्श बीड संघाची विजयी सलामी
या स्पर्धेतील सलामीचा सामना परभणी पीडीसी आणि आदर्श बीड यांच्यात झाला. पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक जिंकून प्रथम परभणी पीडीसी संघाने १७ षटकात सर्वबाद १३६ धावा केल्या. यात अहमद खानने ३६ धावा, सोहेल श्रीखंडेने ५८ धावा तर सोहिल जिंतूरकरने १२ धावा केल्या. आदर्श बीड संघाकडून मोमीन नासेरने भेदक मारा करत ४ गडी बाद केले तर जयने ३ गडी बाद केले.
बीड संघाने १३७ धावांचे लक्ष अवघ्या बाराव्या षटकात १३९ धावा फटकावून सहा गडी राखून विजय सलामी दिली. बीड संघाकडून रुषिकेश सोनवणेने ६७ धावा तर देव नवले याने २३ धावा, हर्षद चुकला याने १९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. परभणी संघाच्या वतीने शिवाजी नायक व मोहम्मद युसुफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.