
मुंबई : १७व्या जिम्नॅस्टिक्स मिनी स्टेट टॅलेंट डिस्प्ले स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध वयोगटात ११४० खेळाडूंनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखवले.
मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १७वी जिम्नॅस्टिक्स मिनी स्टेट टॅलेंट डिस्प्ले मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा येथे घेण्यात आली. या स्पर्धेत ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील गटात एकूण ११४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी २० फ्लोअर सेटवर आपले कौशल्य प्रकार सादरीकरण करून सर्वांची शाबासकी मिळवली. सहभागी सर्व खेळाडूंना श्रेणी सहभाग प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून लिप जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या संस्थापक तन्वी जिंदाल-शेटे, रिलायन्स रिटेल लिमिटेडचे उपाध्यक्ष विनयक आध्ये, उद्योजक डॉ अजय सिंग राठोड, मंगेश इंगळे, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळाचे सचिव दीपक शेटे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी के ढोकरट, अजय मापुस्कर आणि मुंबई सिटी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष वर्षा उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बीपीसीए जिम्नॅस्टिक्स सेंटरच्या खेळाडूंनी विविध साधनांवर सुंदर प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. जिल्हा संघटनेचे सचिव दीपक शिंदे, खजिनदार डॉ राजेंद्र शेळके व सहकारी यांच्या पुढाकारामुळे स्पर्धा यशस्वी झाली.