
बाळासाहेब तोरसकर

खो-खो या मातीतून उगम पावलेल्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रियंका इंगळे हे नाव आज खासच आहे. पुण्यात जन्मलेल्या आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळमआंबा या मूळ गावातून आलेल्या प्रियंकाने मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा आधार यामुळे भारतीय खो-खो क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कुटुंबाचा भक्कम आधार
प्रियंकाच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. तिची आई स्त्रियांसाठी सौंदर्यप्रसाधनांचे दुकान चालवून संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळते. तिचे वडील, जे पूर्वी खाजगी कंपनीत काम करत असत, आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायात आहेत. तिचा लहान भाऊ सध्या बी फार्मच्या शिक्षणात प्रगती करत आहे. प्रियंका नेहमी सांगते की, ‘माझ्या यशामागे माझ्या कुटुंबाचा अतूट पाठिंबा आहे. त्यांच्याशिवाय मी आज या ठिकाणी पोहोचले नसते.’
खो-खोची सुरुवात आणि प्रशिक्षकांचे योगदान
प्रियंकाचा खो-खो खेळाशी ओढा शालेय जीवनापासूनच सुरू झाला. पहिली पासूनच खो-खो पाहत तिने खो-खो मनात रुजवायला सुरवात केली तर चौथीपासून शाळेच्या मैदानावर खो-खो खेळाचा सराव करत ती या खेळाच्या प्रेमात पडली. तिच्या कौशल्यावर आणि नैसर्गिक ताकदीवर लक्ष ठेवून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिला प्रोत्साहन दिले. राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळात तिच्या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षक करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंकाने जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर भक्कम कामगिरी केली. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवली.

माती ते मॅट : एक कठीण प्रवास
प्रियंका सांगते, ‘खरा खो-खो हा मातीतच खेळला जातो. मातीवर कमी गती आणि ताकद लागते, तसेच दुखापतींचे प्रमाण देखील कमी असते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवर खेळावे लागते, जिथे वेग आणि ताकद यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. दुखापतींचे प्रमाण जास्त असले तरी या आव्हानांवर मात करून आम्हाला हा बदल स्वीकारावा लागेल.’
शिक्षण आणि खेळाचा समतोल
प्रियंकाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे झाले. उच्च शिक्षण राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ येथे झाले, तर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने इंद्रायणी महाविद्यालयातून अभ्यास पूर्ण केला. या काळात तिने शिक्षण आणि खेळामधील उत्तम समतोल राखला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश
प्रियंकाचा खो-खोमधील प्रवास अनेक चमकदार यशांनी भरलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर तिने २३ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळल्या असून त्यामध्ये तिने १८ सुवर्णपदके, ३ रौप्यपदके, २ कांस्यपदके जिंकून आपल्या खेळाचा व नावाचा ठसा उमटवला आहे.
प्रमुख पुरस्कार
खो-खो खेळातील विविध पुरस्कार तिने मिळवले असून अनेक महत्वाच्या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलेले आहे.
२०१३-१४च्या किशोरींच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रियंकाला ‘इला’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर खुल्या गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत २०२१-२२ मध्ये प्रियंका ही ‘राणी लक्ष्मीबाई’ पुरस्काराची मानकरी ठरली. २०२२-२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिची चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. महाराष्ट्र शासनाने देखील प्रियंका इंगळे हिचा सन्मान केला आहे. २०२२-२३ या वर्षी प्रियंकाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.
खो-खो खेळाडूंना प्रेरणा देणारा संदेश
प्रियंका म्हणते, ‘खो-खो हा केवळ खेळ नाही, तर तो जीवनातील स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग आहे. आज खो-खो खेळामुळे अनेक खेळाडूंना थेट नियुक्तीच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रत्येकाने आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवून मेहनत करावी, कारण खो-खो हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला ओळख मिळवून देणारा खेळ आहे.’
प्रेरणा आणि आदर्श
प्रियंकाचा प्रवास तिच्या मेहनतीच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रेरणादायी ठरला आहे. खो-खोच्या मैदानावर तिच्या सातत्यपूर्ण यशाने ती आजची तरुण पिढी आणि महिला खेळाडूंसाठी एक आदर्श ठरली आहे. तिच्या यशामुळे भारताला खो-खो क्षेत्रात जागतिक मान्यता मिळाली आहे.
प्रियंका इंगळेचे खो-खो तील योगदान आणि यश हा भारतासाठी अभिमानाचा विषय आहे. तिचा प्रवास हा प्रत्येक खो-खो खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरेल.