नंदुरबार येथे क्रीडा शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

  • By admin
  • January 16, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

खाशाबा जाधव यांची १००वी जयंती नंदुरबार येथे उत्साहात साजरी

नंदुरबार : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १००वी जयंती नंदुरबार येथे राज्य क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांमधील क्रीडा शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने १५ जानेवारी हा दिवस ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. खाशाबा जाधव हे मुळचे कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकून एक नवा इतिहास घडवला होता. देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी म्हणून याची नोंद आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटणारे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश आहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी बळवंत निकुंभ, प्राचार्य.पंकज पाठक, वरिष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र साळुंखे, सुनील सूर्यंवंशी, मीनल वळवी आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा पाटील यांनी केले. तसेच या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश आहिरराव यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील सूर्यवंशी यांनी केले. 

राज्य क्रीडा दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी ओमकार जाधव व संजय बेलोरकर तसेच कार्यालयाचे कर्मचारी मुकेश बारी, कल्पेश चौधरी, दिगंबर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *