
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा
बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष विभागात पालघर, पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर या संघांनी आपल्या गटात विजय मिळविले.

रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात पुरूषांच्या अ गटात पालघर संघाने अमरावती संघावर ५३-३२ असा विजय मिळविला. हाफ टाइमला पालघर संघाकडे २७-१४ अशी आघाडी होती. पालघरच्या प्रतिक जाधवने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमरावतीच्या अभिषेक पवार याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत एकाकी लढत दिली.
ड गटात पुणे शहर संघाने सांगली संघावर ३५-२७ असा विजय मिळविला. हाफ टाइमला पुणे शहर १३-१४ असा पिछाडीवर होता. मात्र प्रशिक्षक तुषार नागरगोजे यांनी खेळाडूंना संयम ठेऊन खेळण्यास सांगितले व त्याचा सकारात्मक परिणाम होऊन संघाला विजय मिळाला. पुणे शहर संघाच्या भाऊसाहेब गोरणे यांने चौफेर आक्रमण करीत आपली पिछाडी भरून काढली. तर कर्णधार सुनील दुबिले याने चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांगलीच्या जीवन प्रकाश याने उत्कृष्ठ चढाय़ा केल्या. तर कर्णधार अभिषेक गर्ग याने पकडी घेत सामन्यात रंगत आणली.
ब गटात कोल्हापूर संघाने विदर्भातील तगड्या समजल्या जाणाऱ्या वाशिम संघाला ४२-२३ असे पराभूत केले. हाफ टाइमला कोल्हापूर संघाकडे १९-१५ अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व साहिल पाटील यांना जोरदार चढाया करीत वाशिम संघाला सावरण्यास संधीच दिली नाही. तर आदित्य पोवार व दादासाहेब पुजारी यांनी सुरेख पकडी केला. वाशिमच्या गजानन कुऱ्हे व आकाश चव्हाण यांनी चांगला खेळ केला.
ब गटात अहमदनगर संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर ४७-२४ असा दणदणीत विजय मिळविला. हाफ टाइमला अहमदनगर संघाकडे २५-११ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या आदित्य शिंदे याने चौफेर आक्रमण करीत संघाला विजय मिळवून दिला. तर सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. मुंबई शहर पश्चिम संघाच्या जयेश यादव याने काहीसा प्रतिकार केला.
क गटात पिंपरी चिंचवड संघाने भंडारा संघावर ५५-३२ असा सहज विजय मिळविला. हाफ टाइमला पिंपरी चिंचवड संघाकडे ३६-१३ अशी आघाडी होती. पिंपरी चिचवडच्या संकेत, हर्षद माने यांनी जोरदार खेळ केला. तर विशाल ताटे याने पकडी घेतल्या. भंडाऱ्याच्या पवन शेंडे उत्कृष्ट चढाया केल्या व ईश्वर उईके याने सुरेख पकडी केल्या.
ड गटात मुंबई उपनगर पूर्व संघाने यवतमाळ संघाचा ४८-३२ असा विजय मिळविला. हाफ टाइमला मुंबई उपनगर पूर्व संघाकडे ३०-१५ अशी आघाडी होती. मुंबई उपनगर पूर्व संघाच्या आकाश रुदेले व सोहम पुंडे यांनी आक्रमक चढाया केल्या. तर अक्षय बरडे यांनी चांगल्या पकडी केल्या. यवतमाळच्या विक्रम राठोड व यशवंत जाधव यांनी चांगला प्रतिकार केला. तर जगदीश राठोड व राहुल भैसरे यांनी पकडी केल्या.
महिला विभागात ब गटात ठाणे शहर संघाने अमरावती संघावर ५८-१६ असा अकतर्फी विजय मिळविला. हाफ टाइमला ठाणे शहर संघाकडे ३५-८ अशी भक्कम आघाडी होती. ठाणे शहर संघाच्या प्राजक्ता पुजारी व देवयानी पाटील यांनी वेगवान चढाया करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. तर माधुरी गवंडी व जुजा जाधव यांनी उक्तृष्ठ पकडी घेतल्या. अमरावतीच्या स्नेहा चौधरी व कल्याणी मेहेर यांनी चांगला प्रतिकार केला. तर दिव्या शर्मा हिने पकडी केल्या.
ड गटात पुणे शहर संघाने नागपूर ग्रामीण संघावर ६३-१६ असा एकतर्फी विजय मिळविला. हाफ टाइमला पुणे शहर संघाकडे ३७-८ अशी निर्णायक आघाडी होती. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे हिने आक्रमक खेळ करीत कर्णधाराला साजेसा खेळ केला. दिप्ती शिंदे हिने चांगल्या पकडी करीत विजयात हातभार लावला. नागपूर ग्रामीणच्या साक्षी झळके हिने एकाकी लढत दिली.
क गटात पालघर संघाने अकोला संघावर ६६-२० असा सहज विजय मिळवित आपली घोडदौड सुरू ठेवली. हाफ टाइमला पालघर संघाकडे ३५-१० अशी भक्कम आघाडी होती. पालघरच्या मोक्षा पुजारी, ज्युली मिस्किता यांनी उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शाहिन शेख व श्रृती सोमसे यांनी चांगल्या पकडी केल्या. अकोल्याच्या प्रीती शिरसाठ व आर्या राऊत यांनी चांगली लढत दिली.
अ गटात सांगली संघाने नागपूर शहर संघावर ६१-२२ असा विजय मिळविला. हाफ टाइमला सांगली संघाकडे २१-११ अशी आघाडी होती. सांगलीच्या कर्णधार श्रद्धा माळी हिने उत्कृष्ठ खेळ केला. रुतुजा अंबी हिने चांगला खेळ केला. नागपूर शहरच्या नताशा रोडकर हिने उत्कृष्ट चढाया केल्या तर ईश्वरी मुळणकर हिने पकडी घेतल्या.