
भारताची रेश्मा राठोड सामन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली : पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने शतकी गुणांच्या हॅटट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रत्येक सामन्यात गुणांची लयलूट केली. भारताने मलेशिया संघाचा ८० गुणांनी पराभव केला.
मलेशिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ४ ड्रीम रन मिळवत संघाला संरक्षणात सुद्धा मजबूत स्थिती मिळवून दिली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाने त्यांच्या अप्रतिम ड्रीम रनने सामन्याची सुरुवात केली. हाफ टाइमला भारताने ४४-०६ अशी ३८ गुणांची आघाडी घेत आपण पुन्हा एकदा गुणांची लयलूट करू असा जणू इशाराच दिला. गेल्या दोन सामन्यात भारताने १७५ व १०० गुण मिळवत एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला होता. या सामन्यात देखील भारताने गुणांची शंभरी गाठली आणि शतकी गुणांची हॅटट्रिक नोंदवली. भारताने हा सामना १००-२० असा ८० गुणांनी जिंकला.
या सामन्यात भारतीय संघाने सामन्याची सुरुवात बचावातील मजबूत कामगिरीसह केली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाच्या ड्रीम रनने सामन्याचा स्वरूप पालटवले. पहिल्या टर्नमध्ये ५ मिनिटे ५० सेकंद बचाव केल्यानंतर सामन्याचा पहिला डाव ६-६ अशा बरोबरीत संपला. त्यानंतर प्रियंका, नीतू आणि मीनू यांनी पहिल्या डावाच्या शेवटी शानदार कामगिरी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला.
दुसऱ्या टर्नमध्ये खेळाच्या फक्त २७व्या सेकंदाला मलेशियाच्या पहिल्या गटातील सर्व खेळाडूंना बाद करण्यात आले. यामुळे भारतीय संघाला मोठा आघाडी घेण्यासाठी संधी मिळाली. मोनिका आणि वझीर निर्मला भाटी यांनी आक्रमणात संघाला प्रचंड बळ दिले. मलेशियाच्या संघासाठी एंग झी यी आणि लक्षिता विजय यांनी संघाला प्रतिकाराची संधी मिळवून दिली. मलेशियाला ड्रीम रन साध्य करण्याची संधी मिळाली होती, पण १ मिनिट ४ सेकंदांनी ते कमी पडले.
तिसऱ्या टर्नमध्ये सुभाष्री सिंगने भारतासाठी आणखी एक ड्रीम रन मिळवला. या डावात भारतीय संघाने ४ मिनिटे ४२ सेकंद शानदार संरक्षण केले. त्यामुळे अंतिम टर्नसाठी संघाने मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या टर्न नंतर स्कोअर ४८-२० असा होता. चौथा डावही भारतीय संघासाठी आक्रमण करताना तितकाच प्रभावी ठरला. सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने ८० गुणांच्या फरकाने मलेशियाला पराभूत केले.
सामन्याचे पुरस्कारसर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : एंग झी यीसर्वोत्कृष्ट बचावपटू : मोनिकासामन्याची उत्कृष्ट खेळाडू : रेश्मा राठोड
दक्षिण कोरिया, अमेरिका बरोबरी
शेवटच्या साखळी सामन्यात पुरुष गटातील चुरशीच्या लढतीत दक्षिण कोरिया आणि अमेरिका हा सामना ६२-६२ असा बरोबरीत झाला. परंतु, क गटात बांगलादेश व श्रीलंका संघाने उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आणखी एका चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मलेशियावर ३५-३४ अशी एका गुणाने मात केली.
महिलांच्या ब गटात इंग्लंड, केनिया व युगांडा या तिन्ही संघाचे समान गुण झाल्यामुळे या गटात प्रथम, द्वितीय क्रमांकासाठी बाद फेरीचा सामना खेळवण्यात येईल.