बॅडमिंटन स्पर्धेत शरयू रांजणेला चार गटात विजेतेपद

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन

पुणे : पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत शरयू रांजणे हिने चार गटात विजेतेपद पटकावले. शरयूने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी, मुलींच्या दुहेरीचे, मिश्र दुहेरी आणि १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावत स्पर्धा गाजवली. 

पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत शरयूने सोयरा शेलारला २१-१६, २१-१३ असे नमविले. त्यानंतर शरयू हिने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत ओजस जोशीच्या साथीने अग्रमानांकित देवांश सकपाळ- सफा शेख जोडीला २१-१७, २१-१२ असे पराभूत करून जेतेपद पटकावले. शरयूने १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सोयरा शेलारला २१-१४, २१-४ असे पराभूत करून तिहेरी यश मिळवले. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत शरयूने सोयरा शेलारच्या साथीने बाजी मारली. या जोडीने अंतिम फेरीत जुई जाधव-सफा शेख जोडीचे आव्हान २१-६, १६-२१, २१-१७ असे परतावून लावले.

चिन्मय, जतिनला दुहेरी मुकुट
चिन्मय फणसेने १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मयने एकेरीच्या अंतिम फेरीत माधव कामतला २१-१४ २१-१२ असे नमविले. त्यानंतर चिन्मय फणसे याने सायजी शेलार याच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय-सायजीने हृदान पाडवे- विहान कोल्हाडे जोडीवर २१-१७, २१-१४ अशी मात करून विजेतेपद पटकावले. 

जतिन सराफने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे आणि १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुहेरीच्या अंतिम फेरीत जतिन सराफने कायरा रैनाच्या साथीने सायजी शेलार-तेजस्वी भुतडा जोडीवर २२-२०, २१-१७ असे नमविले. त्यानंतर जतिनने १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत खुश दीक्षितला २१-९, २१-९ असे सहज पराभूत करून दुहेरी मुकुट मिळवला. कायराने दुहेरी यश मिळवले. तिने १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीच्या जेतेपदानंतर १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने गार्गी कामठेकरला २१-९, २१-१२ असे पराभूत केले.

हर्षद भागवतला दुहेरी मुकुट
हर्षद भागवतने स्पर्धेत ४० वर्षांखालील पुरुष एकेरी आणि ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. भागवतने ४० वर्षांखालील गटात आदित्य काळेला २१-१३, २१-१७ असे, तर ३५ वर्षांखालील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नवीनकुमारला २१-१८, २१-८ असे पराभूत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *